Latest News Killer Animal Attack : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याची दहशत नेमकी किती असते हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. भारतामध्ये असणाऱ्या वनांमध्ये असे अनेक प्राणी काही प्रसंगी मानवी वस्तीवर हल्ले करतात आणि या प्राण्यांचीच दहशत नागरिकांमध्ये पाहायला मिळते. सध्या उत्तर प्रदेशातील एका खेडेगावांत अशाच एका रक्तपिपासू प्राण्याची दहशत पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये लांडग्यांनी उच्छाद मांडला असून, एकदोन नव्हे, तब्बल 30 गावांमध्ये हे प्राणी भटकत असून, सध्या त्यांच्या वावरण्यामुळं गावकऱ्यांना धडकी भरली आहे. रात्री अपरात्रीसुद्घा या गावांमधील मंडळींच्या डोळ्याला झोप नाही, कारण हा प्राणी कधी येऊन घात करेल काहीच सांगता येत नाही.
वनविभागाच्या माहितीनुसार या भागामध्ये जवळपास 6 लांडग्यांचा एक झुंड सध्या नागरिकांसाठी धोका निर्माण करताना दिसत आहे. आतापर्यंत या सहापैकी तीन ते चार लांडगे पकडण्यात वनविभागाला यश मिळालं असलं तरीही उरलेले लांगडे मोकाट असल्यामुळं त्यांना पकडण्यासाठीच वनविभाग प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत आहे.
बहराईत येथे उदभवलेल्या या परिस्थितीचं गांभीर्य पाहता बहराईच, कतर्नियाघाट वाइल्ड लाइफ, श्रावस्ती, गोंडा आणि बाराबंकी येथून जवळपास 25 टीम या लांडग्यांना पकडण्यासाठी तैनात ठेवऱ्या असून, लांडग्यांनी त्यांचाच वावर असणारं क्षेत्रा वाढवल्यामुळं हे संकट ओढावल्याचं म्हटलं जात आहे.
उत्तर प्रदेशातील बहराईच येथील औराही गावापासून या दहशतीची सुरुवात झाली होती. इथं लहान मुलांवर लांडग्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आणि अनेकांचाचा थरकाप उडाला. 7 वर्षांचा फिरोज जवळपास दीड महिन्यापूर्वी लांडग्याच्या हाताशी लागला होता. आईसोबत रात्री गाढ झोपेत असतानाच लांडगा आला या चिमुकल्याला जीवघेणी दुखापत करून गेला. मुलाला त्याच्या आईनं आक्रोश करत वाचवण्याचा प्रयत्न केला पण, तोपर्यंत लांडग्यानं या मुलाला शेतात ओरबडत नेलं होतं. गोंधळ ऐकून गावकऱ्यांना जाग आली आणि त्यांनी लाठ्याकाठ्या घेत शेताकडे धाव घेतली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चिमुरडा सर्वांच्या नजरेत आला आणि त्यांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं. जवळपास 13 दिवसांनंतर फिरोजचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
दरम्यान, सध्या लांडग्यांची दहशत पाहता या गावांमध्ये सूर्यास्तानंतर गावकरी घराबाहेर पडणं टाळत असून, पुरुष मंडळी रात्रीच्या वेळी घराची राखण करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे, तर दिवसाढवळ्यासुद्धा या लांडग्यांच्या भीतीनं गावात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.