Bharat Bandh Today Latest News: विविध मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा 'चलो दिल्ली'चा नारा दिला आणि देशाच्या राजधानीच्या दिशेनं कूच केली. यामध्ये पंजाब प्रांतातील हजारो शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्या देशव्यापी आंदोलनाचा हा चौथा दिवस. संयुक्त किसान मोर्चाकडून याच आंदोलनाच्या धर्तीवर आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद लागू असले. या बंद दरम्यान भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी स्थगित करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी या बंदला वैचारिक बंद म्हणून संबोधलं आहे. (Bharat bandh today Are offices banks closed know latest news on farmers protest)
देशाच्या ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा, शेती आणि तत्सम उद्योग, मनरेगाची कामं, ग्रामीण कामं, खासगी कार्यालयं, ग्रामीण भागातील दुकानं भारत बंदच्या धर्तीवर बंद राहतील. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळं दिल्ली आणि नजीकच्या भागातील वाहतुकीवर याचे परिणाम होणार आहेत. दरम्यान, सध्यातरी शाळांना या बंदमुळं सुट्टी जाहीर केलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णवाहिता, वर्तमानपत्र वितरण, लग्नसोहळे, वैद्यकिय साहित्याची विक्री करणारी औषधालयं, बोर्डाच्या परीक्षा अशा गोष्टींवर मात्र या बंदचे थेट परिणाम दिसणार नाहीत. सध्यातरी कोणत्याही बँकेकडून या बंदच्या धर्तीवर कामकाज बंद ठेवलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. किंबहुना भारतीय रिझर्व्ह बँकेनंही देशातील बँका 16 फेब्रुवारीला सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आंदोलनकर्ते शेतकरी सध्या त्यांच्या उत्पादनासाठी एमएसपीची हमी देणाऱ्या कायद्याची मागणी करत असून, पंजाब आणि हरियाणाच्या रस्त्यांवर आंदोलनं करत आहेत. मनरेगा आणखी प्रभावीपणे राबवणं, जुनी पेन्शन योजना बहाल करणं, सर्व मजुरांना पेन्शन आणि सामाजिक सुरक्षितता निश्चित करणं या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.
दरम्यान, देशातील ग्रामीण क्षेत्रांवर परिणाम करणाऱ्या या बंदचे परिणाम राष्ट्रीय महामार्गावरून सुरु असणाऱ्या वाहतुकीवर होणार नसून बैठकी सुरु राहणार असल्यामुळं आम्ही त्याच अनुषंगानं निर्णय घेणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे.