RJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..."

RJD Leader Thrashed By Woman: एका मंदिरामध्ये अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी या व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला महिलांनी घेरल्यानंतर त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 25, 2023, 01:26 PM IST
RJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..." title=
RJD Leader Thrashed By Woman

RJD Leader Thrashed By Woman: बिहारमध्ये (Bihar) राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने (RJD Leader) महिलेने धमकावलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथील युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशलेल्या भूतनाथ मंदिराच्या परिसरामध्ये बुधवारी (24 मे 2023) सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा सारा प्रकार घडला. अचानक काही महिलांनी एका व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने या व्यक्तीची कॉलर पकडली त्यानंतर गाल पकडून त्याला थेट धमकावलं. ज्या व्यक्तीबरोबर हे सारं घडलं त्याचं नाव तिरुपती यादव (Tirupati Yadav) असं असल्याचं सांगितलं जातं. तिरुपती हा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश सचिव आहे. या नेत्यावर महिला संतापल्याचं पाहून त्याच्याबरोबरचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. आरजेडीच्या नेत्याला धमकावल्याचा आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेमकं घडलं काय?

तिरुपती यादवने महिलांविरोधात अश्लील विधानं केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. ज्या महिलेविरोधात तिरुपती यादवने विधानं केलं तिने थेट तिरुपतीला पकडलं आणि जाब विचारला. या महिलेनं तिरुपतीला धक्काबुक्की केली. हा सारा प्रकार मंदिराच्या आवारात घडला. साहिबगंजवरुन ही महिला आपल्या कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी आली होती. त्यावेळेस आरजेडीचा हा नेता मंदिरामध्ये बसलेला होता. या महिलेला पाहताच या नेत्याने काहीतरी विधान केलं आणि त्याच्यासोबतचे सहकारीही हसू लागले. हे पाहून ही महिला तिच्यासोबत आलेल्या महिलांना घेऊन थेट या व्यक्तीकडे गेली आणि त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला. "खोटं बोललास तर फटकवेन," असं म्हणत या महिलेनं या नेत्याला मारण्याचा प्रयत्न केला.  

बदनाम करण्याचा प्रयत्न

तिरुपती यादव या व्हिडीओमध्ये आपली बाजू मांडताना आपण केवळ आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोलत होतो. आपण या महिलेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असं तो म्हणत होता. आपण अश्लील प्रतिक्रिया दिल्याचा आरोप चुकीचा आहे. आम्ही या मंदिराची काळजी घेतो हे काही लोकांना पचत नसल्याने आमच्यावर असे चुकीचे आरोप करुन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा तिरुपतीने केला आहे.

अशा नेत्यांना पक्षातून काढून टाका

महिलांचा सन्मान न करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अश्लील विधानं करणाऱ्या व्यक्तींना नेतेपदावर ठेवलं जाऊ नये. लालू प्रसाद यादव यांनी अशा व्यक्तींना पक्षामधून निलंबित करावं अशी मागणी या महिलेने केली आहे.

पुरावे सापडतील असा महिलांचा दावा

मात्र यापूर्वीही तिरुपती यादवने स्थानिक महिला देवदर्शनासाठी येतात तेव्हा असे प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे. तिरुपती यादव येथे येणाऱ्या महिलांना कारण नसताना शिव्या देतो असाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हे प्रकरण निवळलं होतं. तिरुपती यादवने यापूर्वी केलेले प्रकार सीसीटीव्हीमध्ये नक्कीच कैद झाले असतील असं म्हणत सीसीटीव्ही फुटेजमधून त्याच्याविरोधात पुरावे मिळतील असं स्थानिक महिलांचं म्हणणं आहे. या प्रकरणामध्ये कोणीही कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही.