पटना : बिहारमधून ट्रेनध्ये दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. चेहऱ्यावर मास्क आणि हातामध्ये बंदूक घालून ट्रेनमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी बुधवारी रात्री प्रवाशांची लुट केली. बिहारच्या क्यूल आणि जमालपुर स्थानका दरम्यान धनौरी स्टेशन (लखीसराय) जवळ तासभर ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांनी दरोडेखोरांकडून किंमती सामान लुटून नेले. बुधवारी रात्री धनौरी स्थानकातून निघालेली ट्रेन नंबर 12350 ही नवी दिल्लीहून भागलपूरला जात होती. साधारण 9.30 च्या सुमारास तासभराहून जास्त वेळ ट्रेनमध्ये दरोडा टाकला जात होता. तोंडाला मास्क लावून आलेल्या साधारण 15 दरोडेखोरांनी हातात बंदूक घेऊन तीन एसी कोच आणि एक स्लीपर कोचला निशाणा बनवलं. कोचमधल्या एकाही प्रवाशांना त्यांनी लुटल्याशिवाय सोडले नाही.
ट्रेनच्या ए 1 (2nd एसी), B2, B3 (3rd एसी) आणि s9 (स्लीपर) कोचमध्ये दरोडेखोरांनी ही लूट करत प्रवाशांना मारहाणही करण्यात आली. यामध्ये काही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेन 12350 ही आठवड्याला दिल्लीहून भागलपूरला जाते.
लुटारुंनी प्रवाशांकडून मोबाईल, लॅपटॉप, दागिने आणि कॅश हिसकावून घेतली. याप्रकरणी जमालपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आतपर्यंत एकाही दरोडेखोराला अटक करण्यात आली नाही. ट्रेनमध्ये लूट झाल्यानंतर जमालपूरमधून रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी भगलपूरसाठी ट्रेन रवाना झाली.