मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी संघटनांनी बुधवारी माहिती दिली की, पाच दिवसांचा आठवडा आणि पेंशन संबधी मुद्द्यांच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
अखिल भारतीय बँक अधिकारी परिसंघ, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, युनाएटेड फोरम ऑफ बँक युनियनने संप पुकरला आहे.
एआयबीईएचे महासचिव सी एच वेंकटचलम यांनी युएफबीयूच्या बैठकीनंतर म्हटले की, पेन्शनधारकांसाठीच्या पेन्शन योजनेत सुधारणा कराव्यात आणि राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी. एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे सात लाख कामगार या संपात सामील होतील.
जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नव्हती. त्याचबरोबर नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10 टक्के रक्कम कापली जाते. यासोबतच 14 टक्के हिस्सा सरकारचा आहे. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून पेन्शन दिली जात होती.
त्याच वेळी, नवीन पेन्शन योजना स्टॉक मार्केट आधारित आहे. आणि त्याचे पेमेंट बाजारावर अवलंबून आहे. जुन्या पेन्शन योजनेत जीपीएफची सुविधा होती, मात्र नवीन योजनेत जीपीएफची सुविधा नाही. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळेच्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती. तर नवीन पेन्शन योजनेत निश्चित पेन्शनची हमी नाही.