बालाकोट एअर स्ट्राईकनंतर सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले

गुप्तचर विभाग आणि सुरक्षा दलांमधील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला होता.

Updated: Jul 9, 2019, 05:00 PM IST
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले title=

नवी दिल्ली: भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधून सीमेवर होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी यासंदर्भातील अहवाल संसदेत सादर केला. यामध्ये म्हटल्याप्रमाणे बालाकोट एअर स्ट्राईकनंतर सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. सुरक्षा दलांच्या नियंत्रण आणि समन्वयामुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये घुसखोरीचे प्रमाण घटल्याचे नित्यानंद राय यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने सीमेवरील घुसखोरीविरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. यासाठी सीमाभागात सुरक्षा दलांकडून गस्त वाढवण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी कुंपण घालण्यात आले होते. याशिवाय, गुप्तचर विभाग आणि सुरक्षा दलांमधील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला होता. परिणामी घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाल्याचे राय यांनी सांगितले. 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारीला पहाटे पाकिस्तानच्या बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदचे तळ हवाई हल्ले करून उद्ध्वस्त केले होते. यामध्ये मोठ्याप्रमाणावर दहशतवादी मृत्यूमुखी पडले होते. या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला होता. या हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानकडूनही भारतीय हद्दीत हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय वायूदलाने हा प्रयत्न उधळून लावला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकची कोंडी करून त्यांना एकटे पाडले होते.