Bajrang Punia receives death threat : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक स्टार विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही खेळाडूंचा निर्णय गेमचेंजर मानला जातोय. अशातच आता बजरंग पुनिया याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एका विदेशी नंबरवरून ही धमकी मिळाली आहे. त्याचबरोबर त्याला काँग्रेस सोडण्याचा इशारा देण्यात आलाय.
बजरंग पुनिया याची किसान काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसातच बजरंग पुनियाला धमकी मिळाली आहे. काँग्रेस सोड नाहीतर तुझं आणि तुझ्या अख्ख्या कुटुंबाचे काही भलं होणार नाही आणि हा आमचा शेवटचा मेसेज असेल, असंही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. एका परदेशी क्रमांकावर व्हॉट्सअँपवर हा मेसेज पाठवण्यात आला आहे. धमकी मिळाल्यानंतर बजरंग पुनिया आणि त्याच्या साथीदारांनी सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दुसरीकडे, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळी विधानं केली जात आहेत. इतकंच नाही तर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला देखील त्यांनी काँग्रेसचे आंदोलन म्हटलं होतं. हरियाणा विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना बृजभूषण सिंह असं वक्तव्य करत असल्याने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार भाजपच्या हायकमांडने त्यांना विनेश आणि बजरंग यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे भाष्य न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. विनेशच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी तिच्यावर टीका केली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्या टीकेवर आता विनेश फोगटने प्रत्युत्तर दिलं. बृजभूषण सिंह म्हणजे देश नाही, माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे. मी ऑलिम्पिकमध्ये जिंकले नाही याचा आनंद आहे, असे ते म्हणत असतील. तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असं विनेशने म्हटलं आहे.