नवी दिल्ली: वादग्रस्त वक्तव्यांवरून कायमच चर्चेत राहणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आता राममंदिरावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजा दशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्रीराम कुठल्या खोलीत जन्माला आले कुणाला माहिती आहे का? राम दशरथाचाच पूत्र आहे, हे तुम्हाला कसे माहिती?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाद्वारा आयोजित 'एक शाम बाबरी मस्जिद के नाम' कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर टीकेला सामोरे जावे लागत आहे. ६ डिसेंबरचा दिवस भारत देशासाठी पतनाचा दिवस होता. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जे काही झाले ते व्हायला नको होते, असेही त्यांनी म्हटले. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडून मोठी चूक झाल्याची कबूलीही त्यांनी यावेळी दिली.
यावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अय्यर यांच्यावर सडकून टीका केली. मणिशंकर अय्यर यांचीही डीएनए टेस्ट झालेली नाही. त्यामुळे ते अय्यर आहेत किंवा पठाण, असा प्रश्न विचारल्यावर त्यांना वाईट वाटणार नाही का, असा प्रतिप्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. श्रीराम हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. या श्रद्धेशी कोणी खेळ करु नये. सर्वोच्च न्यायालयही याबाबत हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्वामी यांनी सांगितले.