'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video

Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होत असतानाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 22, 2024, 11:48 AM IST
'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video  title=
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Mandir Inauguration Ram Lalla idol sculptor Arun Yogiraj video

Ram Mandir Inauguration : (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा भारतासाठी एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा दिवस. 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आणणाऱ्या या मंगलमय दिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आणि निमंत्रितांनी राम मंदिर परिसरात हजेरी लावली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कला, राजकारण, क्रीडा अशा कैक क्षेत्रांतून दिग्गजांनी अयोध्येत हजेरी लावली. या गर्दीमध्ये आपला साधेपणा आणि सामंजस्यानं सर्वांच्या नजरा मात्र एकाच व्यक्तीनं वळवल्या. 

ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून, साक्षात रामलल्लाची मूर्ती साकारण्यारे मूर्तीकार अरूण योगीराज आहेत. राम मंदिर परिसरामध्ये आमंत्रितांनी स्वत:चा उल्लेख नशिबवान म्हणून केलेला असतानाच योगीराज यांनीही आपण या विश्वातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं म्हटलं आणि अनेकांचाच यावर विश्वासही पटला आणि का पटू नये? कारण खुद्द योगीराज यांनीच साकारलेल्या या रामलल्लांच्या मूर्तीला पुढच्या कैक पिढ्या पुजणार असून, हीच मूर्ती इतिहासाचीही साक्ष देणार आहे. 

काय म्हणाले अरुण योगीराज? 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात दाखल झालेल्या योगीराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, 'सध्या मला मी स्वत: या विश्वातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्यासारखं वाटत आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या पूर्वजांचा, माझ्या कुटुंबीयांचा आशीर्वाद मिळाला आहे. रामलल्लांची मूर्ती साकारल्याचं वास्तव पाहतो तेव्हा मला मी स्वप्ननगरीतच असल्याचा भास होतो.'

प्रेरणादायी प्रवास... 

मूर्तीकार अरुण योगीराज यांचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्या निमित्तानं एमबीए पूर्ण केल्यानंतर शिल्पकलेमध्ये करिअर करणारे अरुण योगीराजही प्रकाशझोतात आले. 

शिल्पकलेमध्ये करिअर करण्याचा त्यांचा विचार नव्हता. पण, कुटुंबाला मिळालेला वारसा त्यांना या वाटेवर घेऊन आला. अरुण यांच्या कुटुंबातील 5 पिढ्या शिल्पकलेमध्येच आहेत. एमबीएनंतर कॉर्परेट जॉब न करता अरुणने वडिलोपार्जित व्यवसाय असलेल्या शिल्पकलेमध्येच करिअर सुरु केलं आणि यामध्ये त्यांनी उत्तुंग शिखरं गाठली.