Ayodhya Ramlala Murti First Photo: जय श्री राम! च्या जयघोषानं सध्या अयोध्यानगरी दुमदुमली आहे. त्यातच अयोध्येत बऱ्याच प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये अखेर रामलल्ला विराजमान झाल्यामुळं राम भक्तांचा उत्साह परमोच्च शिखरावर पोहोचला आहे. इथं रामनामाचा जयघोष सुरु असतानाच तिथं मूर्ती विराजमान झाल्याचं पाहिल्यानंतर या मूर्तीचं दर्शन घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आणि अखेर रामलल्लांच्या मूर्तीला याचिदेही याचिडोळा पाहण्याचा तो क्षण सर्वांच्याच नशिबात आला.
शुक्रवार, 19 जानेवारी 2024 रोजी मंदिरामध्ये यज्ज्ञ सुरु झाल्यानंतर पुढील पूजाविधींना प्रारंभ झाला आणि क्षणातच प्रभू श्रीराम यांच्या पाषाणी मूर्तीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. चरणांशी असणारं कमळपुष्प, बाजुनं सुबक नक्षीकाम आणि शुभसूचक चिन्हं असणारी प्रभावळ, कमळावर असणारे देवाचे चरण, पायांमध्ये तोडे, कंबरपट्टा आणि त्याला लागून असणारा पंचा, त्यावर पडलेल्या घड्या असे अनेक बारकावे या मूर्तीमध्ये टीपण्यात आल्याचं पहिल्याच दृष्टीक्षेपात लक्षात येत आहे.
श्रीरामाची मूर्ती पाहताना त्यांची आभूषणं विशेष लक्ष वेधत आहेत. तसंच मूर्तीला असणारी हस्तरचना पाहता त्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर आयुधं दिली जाणार असल्याचं लक्षात येत आहे. रामलल्लांची कर्णफुलं, त्यांची बालरुपातील केशरचना आणि चेहऱ्यावरचं स्मित या मूर्तीला आणखी उठावदार करत आहेत. मूर्तीचं नयनसौंदर्य अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही. अद्यापही मूर्तीच्या डोळ्यांवर कापड असल्यामुळं आता हे अद्वितीय सौंदर्य नेमकं कधी पाहायला मिळणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
11 दिवसांच्या विशेष पूजा आणि धार्मिक विधींनंतर राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान करण्यात आलेल्या या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा पार पडेल. म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती त्यांनी काळ्या शाळिग्राम शिळेपासून तयार केली आहे. 200 किलो वजनी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जुळून आलेला अवध्या 84 सेकंदांचा अती शुभ योग साधण्यात येणार आहे.