Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचं उद्घाटनासंदर्भात देशभरामध्ये उत्साह दिसून येत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यासंदर्भातील जोरदार तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरु आहेत. मात्र या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला चारही शंकराचार्य सहभागी होणार नाहीत असं म्हटलं जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचं पालन करण्यात येत नसल्याचा या शंकराचार्यांचा दावा आहे. आपण शास्त्रांच्याविरोधात जाऊ शकत नाही. याच कारणामुळे आपण या सोहळ्यात सहभागी होणार नाही, असं ते म्हणालेत.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बुधवारी (10 जानेवारी रोजी) हरिद्वारमध्ये यासंदर्भात बोलताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र इतर 2 शंकराचार्यांनी म्हणजेच स्वामी भारतीकृष्ण आणि स्वामी सदानंद सरस्वतींनी या सोहळ्यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. स्वामी भारतीकृष्ण आणि स्वामी सदानंद सरस्वतींनी ते या सोहळ्यात सहभागी होणार की नाही याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. मात्र या सर्वच शंकराचार्यांच्यावतीने बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ज्या नियमावर बोट ठेवलं तो नियम काय आहे जाणून घेऊयात...
स्वामी अविमुक्तेश्वरानंद उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होत असलेला राम मंदिराच्या उद्घटानाचा कार्यक्रम धर्मग्रंथ किंवा नियमांच्याविरोधात असल्याचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. राम मंदिराच्या बांधकामाचं काम पूर्ण झालेलं नाही. पूर्ण बांधकाम होण्याच्याआधीच प्राणप्रतिष्ठापणा करणं सनातन धर्माच्या नियमांचं पहिलं उल्लंघन आहे, असंही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट केलं. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी घाई करायला नको होती, असंही स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
"22 डिसेंबर 1949 रोजी मध्य रात्री वादग्रस्त बांधकामामध्ये भगवान रामाची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. त्यानंतर 1992 साली वादग्रस्त बांधकाम पाडण्यासाठी रामलल्लाची प्रतिमा दुसऱ्या जागी हलवण्यात आली. या सर्व घटना फारच अचानक घडल्याने त्यावेळी कोणत्याही शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केले नव्हते. मात्र आता कसलीही घाई नाही. आपल्याकडे राम मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ होता. अशावेळी पूर्ण बांधकाम झाल्यानंतर रामलल्लांची प्रतिष्ठापणा व्हायला हवी होती," असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आता आम्ही शांत राहू शकत नाही, असं म्हटलं. त्यामुळेच राम मंदिराचं काम पूर्ण करण्याआधी उद्घाटन करणं आणि भगवान श्री रामाची मूर्ती विराजमान करण्याचा विचार योग्य नाही असं माझं मत असल्याचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. कार्यक्रमाचं आयोजन करणारे आम्हाला मोदी विरोधक वगैरे म्हणून शकतील मात्र असं नाहीये. आम्ही आमच्या शास्त्रांच्याविरोधात जाऊ शकत नाही.
स्वामी निश्चलानंद सरस्वती हे ओडिशामधील जगन्नाथपुरी येथील गोवर्धनपीठाचे शंकराचार्य आहेत. त्यांनाही मंदिराच्या उद्घाटनामध्ये शास्त्रांमधील नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं म्हटलं आहे. "माझा कोणताही सल्ला घेण्यात आला नाही म्हणून मी नाराज आहे अशी कोणतीही गोष्ट नाही. मात्र स्कंद पुराणानुसार जर नियम आणि रीति-रिवाजांचं योग्य पद्धतीने पालन करण्यात आलं नाही तर प्रतिमेमध्ये चुकीच्या वस्तू प्रवेश करतात आणि त्या क्षेत्राला त्या नष्ट करतात," असं स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितलं.
स्वामी निश्चलानंद यांनी मंदिराच्या उद्घटनासाठी निमंत्रण मिळाल्याचं सांगितलं. मात्र आताच आपण मंदिरात जाणार नाही. सनातन धर्मानुसार कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हा मी जाईन, असं स्वामी निश्चलानंद म्हणाले. स्वामी निश्चलानंद यांनी सध्याही आपण अयोध्येला जात असतो असंही सांगितलं. सध्या जिथे रामलल्ला आहे तिथे मी माथा टेकवतो. मी पुन्हा त्याच जागी माथा टेकवायला नक्कीच जाईन असंही स्वामी निश्चलानंद म्हणाले.
इतर 2 शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्वामी भारतीकृष्णा दक्षिण भारतातील चिकमंगळुरु येथील शृंगेरी मठाचे शंकराचार्य आहेत. तर स्वामी सदानंद सरस्वती पश्चिममधील गुररातमधील द्वारका येथील शारदा मठाचे शंकरार्य आहेत.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी यासंदर्भात बोलताना राम मंदिर रामानंद संप्रदायचं आहे. हे मंदिर शैव, शाक्या आणि संस्थान्यांचं नाही, असंही ते म्हणाले. चंपत राय यांनी मंदिराचं बांधकाम 3 मजल्यांमध्ये केलं जात आहे. पहिल्या फ्लोअरचं काम पूर्ण झालं आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना याच ठिकाणी होणार आहे. यासाठीच तयारी सुरु आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे.