राम मंदिरला देणगी देणाऱ्यांना सरकारकडून 'ही' सवलत

 या कार्यासाठी देणगी देणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी 

Updated: May 9, 2020, 08:15 PM IST
राम मंदिरला देणगी देणाऱ्यांना सरकारकडून 'ही' सवलत  title=

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदीर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे देशभरातील राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या मंदिराची निर्मिती कशी होणार ? यासाठी निधी कसा उभा राहणार ? याची चर्चा सुरु आहे. दरम्यान या कार्यासाठी देणगी देणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या देणगीदारांना सरकारतर्फे सवलत मिळणार आहे. यांना टॅक्समध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

८० जी अंतर्गत सवलत

राम मंदिरसाठी दान देणाऱ्यांना ८० जी अंतर्गत सवलत देण्याचा निर्णय झालाय. शुक्रवारी केंद्र सरकारने यासंदर्भातील अधीसूचना जाहीर केली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस ( CBDT) ने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रास ऐतिहासिक महत्वाचे स्थान आणि सार्वजनिक पूजेचे स्थान म्हटले आहे. ८० जी अंतर्गत ट्रस्टला दान करणाऱ्यास ५० टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे. ट्रस्टमधून होणाऱ्या कमाईला आधीच कलम ११ आणि १२ अंतर्गत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

८० जी अंतर्गत सर्वच धार्मिक ट्रस्टना सवलत दिली जात नाही. कोणत्याही धार्मिक ट्रस्टला आधी कलम ११ आणि १२ अंतर्गत आयकरमधून सवलत मिळण्यासाठी नोंदणी अर्ज करणे गरजेचे आहे. यानंतर कलम ८० जी अंतर्गत सवलत दिली जाते. याआधी केंद्र सरकारने २०१७ मध्ये ८० जी अंतर्गत धार्मिक ट्रस्टला सवलत दिली होती. चेन्नईतील अरुलमिगु कपालेश्वर थिरुकोइल, अरियाकुडी श्री श्रीनिवास पेरुमल मंदिर आणि सज्जनगड, महाराष्ट्रात श्रीराम आणि रामदास स्वामी समाधी मंदीर आणि रामदास स्वामी मठास ही सवलत मिळाली आहे. 

कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे अयोध्या राम मंदीर निर्माणाचे काम सुरु होऊ शकले नाही. पण आता लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या सवलतीनंतर राम जन्मभूमी परिसरात कामास पुन्हा सुरुवात झाली आहे. परिसरात स्वच्छतेसोबतच जमीन सपाटीकरणास सुरुवात झाली आहे.