अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट

5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील रहिवाशांना आणि इतर लोकांना 1.25 लाखहून अधिक लाडू वाटण्यात येणार आहेत.

Updated: Aug 4, 2020, 06:41 PM IST
अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार असून त्यासह प्रभु श्री रामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचं काम सुरु होणार आहे. अयोध्येत भूमिपूजनच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विशेष भेटही देण्यात येणार आहे. अलिगडमध्ये तयार केलेली अष्ट धातूची खास राम मूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमीपूजनानंतर, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, अलिगडमध्ये अष्ट धातूपासून तयार केलेली श्री रामाची खास मूर्ती भेट करणार आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी बुधवारी भूमिपूजन समारंभात आमंत्रित केलेल्या प्रत्येक पाहुण्यांना चांदीची नाणी प्रसाद म्हणून भेट दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला राम मंदिराच्या चित्रासह, त्यात राम, सीता, लक्ष्मण, हनुमानही आहेत, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ट्रस्टचं चिन्ह आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी येणाऱ्या, आमंत्रितांना लाडूचा डब्बा आणि राम मंदिराचा फोटोही भेट म्हणून दिला जाणार असल्याचीही माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील रहिवाशांना आणि इतर लोकांना 'रघुपती लाडू' नावाचे 1.25 लाखहून अधिक लाडू वाटण्यात येणार आहेत.

भूमिपूजनासाठी इतर जिल्ह्यातून, राज्यातून येणाऱ्या पाहुण्यांना, मंगळवारी संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहचण्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. 

भूमिपूजनासाठी एकूण 175 लोकांना श्री राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आलं आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या जवळपास 135 संतांचा समावेश आहे. प्रत्येक आमंत्रण पत्रिकेवर सुरक्षेच्या दृष्टीने एक कोड बनवण्यात आला आहे.