'काँग्रेसने अगोदर राहुल गांधींच्या लग्नाचा मुहूर्त शोधावा'

केवळ हिंदुंसाठीच राममंदिर असावे

Updated: Aug 4, 2020, 06:22 PM IST
'काँग्रेसने अगोदर राहुल गांधींच्या लग्नाचा मुहूर्त शोधावा' title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, अयोध्या: अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्तावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसवर साध्वी प्राची यांनी पलटवार केला आहे. त्या मंगळवारी अयोध्येत 'झी २४ तास'शी बोलत होत्या. यावेळी साध्वी प्राची यांनी म्हटले की, काँग्रेसने राममंदिराच्या भूमिपूजन मुहूर्ताची चिंता करु नये. त्यांनी अगोदर राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुहूर्त शोधावा.

'राम मंदिरांचं भूमिपूजन राजीव गांधींच्या हस्ते अगोदरच पार पडलंय'

तसेच राममंदिर बांधताना आता सर्वधर्म समभावाची भाषा कशाला हवी? राम मंदिरासाठी शेकडो लोकांचा जीव गेलाय. जेव्हा हिंदुंच्या कत्तली झाल्या तेव्हा कुठे गेला होता सर्वधर्म समभाव? त्यामुळे आता केवळ हिंदुंसाठीच राममंदिर असावे. राम मंदिराविरोधातील याचिकाकर्ते इक्बाल अंसारी यांना भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले असले तरी तो संघटनेचा अंतर्गत विषय आहे, असे साध्वी प्राची यांनी सांगितले. 

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

कालच काँग्रेसच ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राममंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकीचा असल्याची टीका केली होती. अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?” असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते. 

दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्यतेली सर्व मंदिरे खुली ठेवण्यात येणार असून लोकांना दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.