नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता त्याच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही फी ग्राहकांवर ऑगस्ट महिन्यापासून लागू होईल. अशा परिस्थितीत काही बँकांनी आपल्या ग्राहकांना एटीएममधून अमर्यादित रोख रक्कम काढण्याची सूट दिली आहे. देशातील अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी मेट्रो शहरांमध्ये अन्य बँकेच्या एटीएममधून 3 वेळा पैसे काढण्यासाठी विनामूल्य सेवा देण्यात आली आहे. त्याच बरोबर नॉन मेट्रो व्यवहार अन्य बँकेच्या एटीएममधून केल्यास ते 5 वेळा विनामूल्य आहेत.
ग्रामीण भागात जास्तीत जास्त 5 वेळा एटीएममधून व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. तर ज्या बँकांनी आपल्या ग्राहकांना अमर्यादित नि: शुल्क रोख पैसे काढण्याची सुविधा दिली आहे, त्या बँकांमध्ये इंडसइंड बँक (IndusInd Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि सिटी बँकेचा (Citi Bank)समावेश आहे. इतर बँकांमध्ये
रोकड काढून घेण्यावरील शुल्क आता 20 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आले आहे.
आरबीआयने बँकांना इंटरचेंज चार्ज म्हणून 16 रुपयांऐवजी 17 रुपये घेण्यास परवानगी दिली आहे. तर आर्थिक व्यवहाराची फी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढवली आहे. बँकबाझारच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही आयडीबीआय बँकेचे ग्राहक असाल किंवा बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एटीएमवरून विनामूल्य अमर्यादित व्यवहार करत आहे. इंडसइंड बँकेत देखील तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी विनामूल्य सेवा देण्यात आली आहे.