ATM Dispenses 5 Times More Amount: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आग्र्यात (Agara) एक विचित्र घटना घडल्याने एटीएम (ATM) समोर लांबच लांब रांग लागल्याचं चित्र पहायला मिळालं. येथील एका एटीएममध्ये जेवढी रक्कम एण्टर केली जात होती त्याच्या 5 पट रक्कम डिस्पॅच होत होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् या एटीएमबाहेर लोकांची लांबच लांब रांग लागली. अनेकांनी 5 हजारांची एन्ट्री करुन 25 हजार रुपये घरी घेऊन गेले. यासंदर्भातील माहिती संबंधित बँकेला समजल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या. आता पोलिसांनी अशाप्रकारे कमी एन्ट्री करुन अधिक रक्कम काढणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शास्त्रीपुरम येथील प्राची एनक्लेव्ह येथे असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या बाजूला असलेल्या एटीएममध्ये अचानक तंत्रिक बिघाड निर्माण झाला. एटीएममध्ये हा बिघाड निर्माण झाल्याने जितकी रक्कम एन्टर केली जात होती त्याच्या 5 पट रक्कम या एटीएम मशीनमधून बाहेर येत होती. एका व्यक्तीने 1 हजार रुपये काढण्यासाठी एटीएम वापरलं असता 5 हजार रुपये एटीएममधून बाहेर आले. तर 5 हजार काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तब्बल 25 हजार मिळाले. यासंदर्भातील माहिती बँकेला समजल्यानंतर गोंधळ उडाला आणि बँकेच्या मॅनेजरने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस सध्या हे मशीन खराब असताना कोणकोण पैसे काढून गेलं याचा शोध घेत आहे. दरम्यान पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 4 ग्राहकांनी अतिरिक्त पैसे पुन्हा बँकेत येऊन जमा केले आहेत.
एटीएम मशीनमधील तांत्रिक गडबड झाल्याने हे घडलं. सर्वात आधी एका व्यक्तीला 1 हजार काढताना 5 हजार मिळाले. त्यानंतर पुन्हा त्याने नव्याने व्यवहार केला असता पुन्हा तेच घडलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाहेर लोकांची लांबच लांब रांग लागली. अनेकांनी एन्टर केलेल्या रक्कमेपेक्षा 5 पट अधिक रक्कम घरी नेली. कॅश कलेक्शन टीमच्या सीएमएसने दिलेल्या माहितीनुसार या एएटीममधून 1 लाख 72 हजार रुपये काढण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती बँकेला मिळाल्यानंतर तातडीने एटीएम बंद करण्यात आलं. मात्र तोपर्यंत अनेकांनी पैसे काढून घेतले होते. आता सीसीटीव्हीच्या आधारे पैसे काढून नेणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.