उदयपूरमध्ये आलिशान रिसॉर्ट, पाहुण्यांसाठी 'खास' सुविधा; दोन कोटींची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले

राजस्थानमध्ये दोन कोटींच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एसएसपी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) दिव्या मित्तल यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या रिसॉर्टवर मद्य सापडलं आहे.  

Updated: Jan 19, 2023, 10:09 AM IST
उदयपूरमध्ये आलिशान रिसॉर्ट, पाहुण्यांसाठी 'खास' सुविधा; दोन कोटींची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले title=
दोन कोटींच्या लाच प्रकरणी एसएसपी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) दिव्या मित्तल यांना अटक

राजस्थानमध्ये दोन कोटींच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एसएसपी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) दिव्या मित्तल यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. अटकेनंतर पोलिसांनी उदयपूरजवळील चिकलवास येथील त्यांच्या फार्म हाऊस आणि रिसॉर्टवर धाड टाकली असून मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आलं आहे. हे मद्य तिथे येणाऱ्या विशेष पाहुण्यांना दिलं जात होतं. 

रिपोर्टनुसार, हे रिसॉर्ट पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलेला पोलीस कर्मचारी सुमीत कुमार चालवत होती. तो लाचखोरी प्रकरणातील दलालही आहे. अबामाता पोलिसांनी सुमित आणि दिव्या मित्तलविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मोठ्या प्रमाणात मद्य जप्त

पोलिसांनी एएसपी दिव्या मित्तलच्या रिसॉर्टवरुन बिअरच्या २७ बाटल्यांसह मोठ्या प्रमाणात मद्य जप्त केलं आहे. रिसॉर्टमध्ये मद्याची विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना घेण्यात आला नव्हता. 

हे मद्य रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना दिलं जात होतं. याच रिसॉर्टमध्ये दिव्या मित्तल यांच्या सांगण्यावरुन सुमित कुमारने आरोपींना धमकावून त्यांच्याकडून दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. याआधी सुमित कुमारने दिव्या मित्तल यांच्या नावे २५ लाखांचा पहिला हफ्ता मागितला होता. सुमित कुमार अजमेरला जावून हे पैसे दिव्या मित्तल यांना देणार होता. 

एसीबीने केली अटकेची कारवाई

राजस्थानच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या (ACB) जयपूर टीमने दोन कोटींच्या लाच प्रकरणी कारवाई करत दिव्या मित्तल यांना अटक केली. एसीबीने दिव्या मित्तल यांच्या अजमेरमधील निवासस्थानाची पाहणी केल्यानंतर अटकेची कारवाई केली होती. 

मी कोणाकडेही लाच मागितली नाही - दिव्या मित्तल

आपण ड्रग्ज माफियांवर कारवाई केल्यानेच अटक झाली असल्याचा आरोप दिव्या मित्तल यांनी केला आहे. इतकंच नाही, तर अजमेरमधील पोलीस अधिकारीही ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांचा आरोप आहे. एसीबीचं पथक निवासस्थानावरुन अटक करुन घेऊन जात असताना दिव्या मित्तल यांनी आपण कोणाकडेही लाच मागितली नाही असा दावा केला. 

मूळच्या हरियाणाच्या आहेत दिव्या मित्तल

अजमेरमध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्या मित्तल मूळच्या हरियाणाच्या आहेत. मात्र त्यांचं कुटुंब 45 वर्षांपूर्वी हरियाणा येथून चिडावा येथे शिफ्ट झालं. त्यांच्या वडिलांनी चिडावामध्ये ट्रॅक्टर एजन्सी सुरु केली होती. यानंतर त्यांच्या दोन भावांनी खासगी बस, खोदकाम या व्यवसायात लक्ष घातलं होतं. दिव्या मित्तल यांचं शिक्षण चिडावामध्येच झालं.