Raghuram Rajan on Rahul Gandhi: "राहुल गांधी पप्पू नाहीत, ते तर...", रघुराम राजन स्पष्टच बोलले

रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी एक हुशार व्यक्ती असल्याचंही सांगितलं आहे. तसंच राजकारणात प्रवेश करण्यावरही भाष्य केलं आहे.   

Updated: Jan 19, 2023, 09:22 AM IST
Raghuram Rajan on Rahul Gandhi: "राहुल गांधी पप्पू नाहीत, ते तर...", रघुराम राजन स्पष्टच बोलले title=

Raghuram Rajan on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य करताना राजकीय नेत्यांकडून अनेकदा त्यांचा 'पप्पू' म्हणून उल्लेख केला जातो. राहुल गांधी यांनी यावर अनेकदा भाष्य केलं असून उत्तर दिलं आहे. दरम्यान राहुल गांधींसह 'भारत जोडो' यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झालेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनीही यावर भाष्य केलं आहे. गेल्या महिन्यात भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली होती, तेव्हा रघुराम राजन त्यात सहभागी झाले होते. रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी एक हुशार व्यक्ती असल्याचंही सांगितलं आहे. 

"राहुल गांधींची जी प्रतिमा उभी करण्यात आली आहे, ती दुर्दैवी आहे. मी त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही प्रकारे 'पप्पू' (मूर्ख) नाहीत. ते एक हुशार, तरुण, जिज्ञासू आहेत," असं रघुराम राजन म्हणाले आहेत. 

"आपल्या प्राथमिकता काय आहेत, त्यातील जोखीम आणि त्यांचं मूल्यमापन करण्याची क्षमता याची चांगली जाणीव असणं महत्वाचे आहे. मला वाटते की राहुल गांधी ते करण्यास सक्षम आहेत," असंही त्यांनी सांगितलं. 

रघुराम राजन यांनी यावेळी 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचं कारणही सांगितलं. 'भारत जोडो' यात्रेशी जोडल्या गेलेल्या मूल्यांशी आपण सहमत असल्याचं ते म्हणाले आहेत. 

रघुराम राजन यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारवर टीका करण्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की "मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारवरही आपण टीका करत होतो". दरम्यान राजकारणात प्रवेश करणार असल्याचं वृत्त त्यांनी यावेळी फेटाळून लावलं. 

"भारत जोडो यात्रेच्या मूल्यांशी सहमत असल्याने मी त्यात सहभागी झालो होतो. पण मी कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नाही," असं रघुराम राजन यांनी सांगितलं आहे. 

‘पप्पू’ चिडवणाऱ्यांना राहुल गांधींनीही दिलं होतं उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला ‘पप्पू’ उल्लेख करण्यावर कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. हा त्यांच्या प्रचाराचा भाग असल्याची टीका त्यांनी केली होती. “यावरुन त्यांच्या मनातील भीती दिसते. ते निराश आहेत,” असं राहुल गांधी म्हणाले होते. 

“मला कोणत्याही नावाने पुकारलं तरी त्यांचं स्वागत आहे. मला चांगलं वाटत आहे. कृपया माझं नाव वारंवार घेत जा,” असा टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला होता.