Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला लक्ष्य केलं. मणिपूर हिंसाचाराबरोबरच हरियाणामधील सध्याच्या स्थितीचा उल्लेख करत या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ओवैसी यांनी केली. या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी त्या राज्यांमधील मुख्यमंत्री जबाबदार का नाहीत, असा प्रश्न ओवैसींनी केंद्रामध्ये आणि या दोन्ही राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला. तसेच हे मुख्यमंत्री जर हिंसाचारासाठी जबाबदार असतील तर त्यांना अजून हटवण्यात का आलं नाही. ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ओवैसींनी केलेल्या भाषणादरम्यान मणिपूर आणि हरियाणामधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही ओवैसींनी केली. या राज्यांमध्ये 50 हजारांहून अधिक लोक बेघर झाले. मात्र हे सारं होत असताना तेथील मुख्यमंत्री नेमकं काय करत होते? असा प्रश्न ओवैसींनी विचारला. लाखोंच्या संख्येनं हत्यारांची चोरी केली जात आहे, असंही ओवैसी म्हणाले. 'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो उतार क्यों नहीं जाते?' अशा शेरोशायरीच्या माध्यमातून ओवैसींनी सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना ओवैसी यांनी खडे बोल सुनावले.
देशात द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात आहे, असा आरोप ओवैसींनी केला. मणिपूरमध्ये हत्यारांचे साठ्यांची लूट केली जात आहे. या देशात कोणत्या प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे? असा प्रश्न ओवैंसींनी उपस्थित केला. बिलकिस बानो देशाची मुलगी नाही का? या गरोदर महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींना सोडून देण्यात आलं. समस्या सिमारेषेवर नाही तर दिल्लीत आहे, अशी टीका ओवैंसींनी केली आहे. देशात एकीकडे चौकादार बसलाय तर दुसरीकडे दुकानादार बसला आहे, अशा शब्दांमध्ये ओवैसींनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
एआयएमआयएमच्या प्रमुखांनी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान हरियाणामधील हिंसाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. नूंहमध्ये मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं, असा आरोपही ओवैसी यांनी केला. तसेच सरकारने सीमाप्रश्नावर बोलावं आणि 'चीनला देशाबाहेर फेकावं' अशी मागणीही ओवैसी यांनी केली.