Asaduddin Owaisi On The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन (The Kerala Story) देशभरामध्ये दोन गट पडलेले असतानाच एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) या चित्रपटासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना या चित्रपटाचा प्रचार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. तसेच चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांनाही ओवेसींनी सुनावलं आहे.
पत्रकारांनी 'द केरळ स्टोरी'संदर्भातील प्रश्न विचारल्यानंतर ओवेसींनी हिटलरचं उदाहरण दिलं. "आपण इतिहास विसरतो. जर्मनीमध्ये हिटलरने 75 लाख यहुदींना संपवलं. त्याने या यहुदींना कसं संपवलं? सुरुवातीला हिटलरने सांगितलं की ज्यू लोकांविरोधात हेट स्पीच द्या. त्यानंतर त्याने सांगितलं की हेट स्पीचमधून असं सांगा की हे जर्मनीशी इमानदार नाहीत. तिसरी गोष्ट त्याने सांगितली की हे आर्यन वंशाचे नाहीत असं सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. 1940 मध्ये हिटलरने जो ज्यू लोकांविरोधातील चित्रपट बनवला होता. जर्मनीमधून इंग्रजीत भाषांतर केलं तर चित्रपटाच्या नावाचा अर्थ इटरनल ज्यू असा होता. त्या चित्रपटामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की, ज्यू लोक जर्मनीशी प्रमाणिक नाहीत. ज्यू लोक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात असं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर जर्मन जनतेमध्ये ज्यू लोकांविरोधात द्वेष भावना निर्माण झाली आणि हिटलरचा रस्ता मोकळा झाला. 70 लाख ज्यू लोकांना गॅस चेंबरमध्ये टाकून त्यांची हत्या केली गेली. त्यानंतर इतरांना तुरुंगात कोंडून मारण्यात आलं. यामधून आपण शिकलं पाहिजे," असं ओवेसी म्हणाले.
तसेच ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. "देशाचे पंतप्रधान फार मोठे अभिनेते आहेत. हे आपलं नशीब आहे की ते अभिनय क्षेत्रात गेले असते तर इतर सर्व कलाकार घरीच बसले असते. सर्व फिल्मफेअर पुरस्कार त्यांनाच मिळाले असते. मात्र पंतप्रधान अभिनेत्याबरोबरच आता चित्रपटांचे प्रचारकर्तेही झाले आहेत. एका देशाचे पंतप्रधान जे आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या आधारे शपथ घेतो, जो 130 कोटी लोकांच्या देशाचं प्रतिनिधित्व करतो तो एका चित्रपटाचं प्रमोशन करतो. आणि तो चित्रपट सुद्धा खोटा आहे," असं ओवेसी म्हणाले.
त्याचप्रमाणे ओवेसींनी चित्रपटांच्या निर्मात्यांनाही काही प्रश्न विचारले. "चित्रपट बनवणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे की हा चित्रपट काल्पनिक आहे की सत्य घटनेवर आधारित आहे? तुम्ही किती दिवस मुस्लिमांना बदनाम करुन आपलं पोट भरणार? थोडी तरी लाज बाळगा. तुम्ही बुरखा परिधान केलेल्या महिला दाखवता, खोटं दाखवता. आधी म्हणाले 32 हजार महिलांना फसवलं कोर्टात प्रकरण गेल्यावर ही संख्या 3 हाजारांवर आली. किती खोटं बोलणार? पोट भरण्याची इतर माध्यमं असतील की!" असा खोचक टोला ओवेसींनी लगावला.
"आयसीसविरोधात भारतामधील जेवढ्या मुस्लिम संस्था आहेत त्यांनी सर्वांना त्याचा निषेध केला. त्या संघटनेमध्ये सर्वाधिक तरुण हे पाश्चिमात्य देशांमधून सहभागी झाले. ज्यात इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम असो यासारख्या कथित लोकशाही देशांमधून तरुण या संघटनेत दहशतवादी म्हणून सहभागी झाले आणि तुम्ही काय प्रमोट करताय? हे जे तुम्ही करताय ते पाहून आयसीसीवाल्यांना आनंद होत असेल," असा टोला असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.