'देशात आणीबाणी लादणाऱ्यांच्या नातवाचा डीएनए दिसला'

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी ट्विट करून राहुल गांधींना खडेबोल सुनावले.

Updated: Jan 3, 2019, 01:43 PM IST
'देशात आणीबाणी लादणाऱ्यांच्या नातवाचा डीएनए दिसला'  title=

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणाऱ्या 'एएनआय'च्या संपादक स्मिता प्रकाश यांच्यावरच थेट टीका केल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आता भाजपनेही राहुल गांधी यांना लक्ष्य केले असून, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी ट्विट करून राहुल गांधींना खडेबोल सुनावले. एका स्वतंत्र संपादकांवर शाब्दिक हल्ला चढवून देशात आणीबाणी लागू करणाऱ्यांच्या नातवाने त्याचा खरा डीएनए दाखवून दिला असल्याचे ट्विट जेटली यांनी केले. तर स्मिता प्रकाश यांच्यावरच टीका करण्याचा राहुल गांधींचा स्टंट अत्यंत खालच्या दर्जाचा होता, असे पत्रकारांच्या संघटनेने म्हटले आहे. 

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी 'एएनआय'ला मुलाखत देत सध्याच्या विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. या मुलाखतीनंतर काँग्रेसने त्यावर टीका करीत त्यातील प्रश्न आधीच ठरलेले होते आणि हे सर्व पूर्वनियोजित नाट्य होते, असे सांगितले. मुलाखतीच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, त्यांच्यामध्ये (मोदी) पत्रकार परिषदेला सामोरे जात तुमच्यासमोर येऊन बसण्याची हिम्मत नाही. पण मी तुमच्यासमोर येतो. तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता. आठ ते दहा दिवसांतून मी सातत्याने इथे येत असतो. तुम्ही पंतप्रधानांची कालची मुलाखत बघितली का, अत्यंत दयनीय मुलाखत होती. मुलाखतकार स्वतःच प्रश्न विचारत होत्या आणि त्याच उत्तरेही सुचवत होत्या. 

राहुल गांधी यांच्या टीकेला खुद्द स्मिता प्रकाश यांनीही उत्तर दिले. पत्रकार परिषदेत माझ्यावर शाब्दिक हल्ला करण्याची तुमची कृती निंदनीय आहे. मी फक्त प्रश्न विचारत होते आणि कोणतीही उत्तरे सुचवत नव्हते. तुम्हाला मोदींवर टीका करायची आहे. जरूर करा. पण माझ्यावर आरोप करू नका. देशातील एका सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांकडून हे अपेक्षित नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 
दरम्यान या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पत्रकारांना धमकावण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकारांबद्दल काँग्रेसचा दृष्टिकोनच यातून दिसतो. राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांनी म्हटले आहे.