धक्कादायक : भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

गुपित माहितीच्या आधारे याठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

Updated: Jun 6, 2021, 07:11 AM IST
धक्कादायक : भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब title=

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 51 क्रूड बॉम्ब म्हणजेचं देशी बॉम्ब आढळले आहेत. कोलकातामधील खिदिरपूर चौकाजवळ एका बॅगेत हे आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजप कार्यालयाजवळ हे बॉम्ब आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताचं बॉम्बची विल्हेवाट लावण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पथकाला हे 51 बॉम्ब निष्क्रिय करण्यात यश मिळालं आहे. हे सर्व बॉम्ब कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती सविस्तर मिळू शकलेली नाही. 

हे बॉम्ब कोलकाता पोलिसांच्या ऍन्टी राउडी सेक्शननं जप्त केले आहेत. गुपित माहितीच्या आधारे याठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ही जागा हेस्टिंग क्रॉसिंग भागात येते. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी देखील पश्चिम बंगालमधून देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या काळात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी पोलिसांनी 41 क्रूड बॉम्ब आढळून आले होते.

दक्षिण 24 परगनाच्या बारुईपुर भागात हे बॉम्ब आढळले होते. पोलिसांच्या झाडाच्या झुडपातून हे बॉम्ब जप्त केले. याआधी 26-28 मार्चच्या दरम्यान 82 बॉम्ब जप्त करण्यात आले होते. नरेंद्रपूरमध्ये देखील 56 क्रूड बॉम्ब आढळले होते. तेव्हा देखील निवडणुकींचं वातावरण होतं. पश्चिम बंगालमध्ये सतत बॉम्ब आढळत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.