'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी मानसिकतेचे अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

पंतप्रधान कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे.

Updated: Mar 2, 2020, 09:38 AM IST
'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी मानसिकतेचे अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात' title=

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयातील काही हिंदूविरोधी विचारसरणीचे अधिकारी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान कार्यालयात हिंदूविरोधी विचारसणीच्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. यापैकी काहीजण शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. या अधिकाऱ्यांच्या गटाकडून पंतप्रधान कार्यालयातील देशभक्त अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) दिल्लीत ज्याप्रकारे आंदोलनाचे लोण पसरले त्यावरून आपण धडा घेतला पाहिजे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

त्यामुळे आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपांचा रोख नेमका कोणत्या अधिकाऱ्यांच्या दिशेने आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत CAAच्या मुद्द्यावरून प्रचंड हिंसाचार झाला होता. यामध्ये ४० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दिल्लीच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी केंद्राकडे असल्यामुळे मोदी सरकार सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. 

दिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार

आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यावेळी विरोधकांकडून दिल्ली हिंसाचारासंदर्भात चर्चेची मागणी केली जाणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करणार आहेत. 

'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'

तत्पूर्वी शरद पवार यांनी रविवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दिल्लीतील हिंसाचारावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश न मिळाल्यामुळे जातीय दंगली भडकवल्या जात आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता.