नवी दिल्ली : नागरिकत्वविरोधी कायद्याच्या (Citizenship Amendment Bill) निषेधांनी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) हिंसाचार उफाळला आहे. रेल्वे स्थानक पेटविले गेले असून संतप्त जमावाने बसची तोडफोड केली आहे. नागरिकत्वविरोधी कायद्याच्या निषेधाचा परिणाम शनिवारी पश्चिम बंगालच्या काही भागात दिसू आला. हावडा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. निषेध करणार्यांनी रस्ते रोखले आणि रेल्वे स्थानकांची तोडफोड केली. यामुळे वाहतूकीवर याचा परिणाम झाला. रेल्वे सेवेलाही अडथळा निर्माण झाला. आंदोलकांनी बसचीही तोडफोड केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले.
संतापलेल्या जमावाने उल्बुरिया रेल्वे स्थानकात रेल्वे इंजिनवर दगडफेक केली आणि ट्रॅकवर नाकाबंदी केली. त्यामुळे काहीवेळ रेल्वे वाहतूक ठप्प होती. मुर्शिदाबाद येथे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. जंगीपूर, महिपाल आणि अन्य रेल्वे स्थानकांवर गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. लालगोला ते पलासी दरम्यानच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी सकरेल स्टेशनवरील रेल्वे तिकीट घरच पेटवून दिले.
पश्चिम बंगलाच्या हावडा शहरात कॅब आणि एनआरसी विरोधकांनी डोमजूर सालापजवळ टायर जाळून महामार्ग रोखला. पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स या भागात तैनात करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आंदोलकांनी शनिवारी सकाळी एका स्टेशनवर तोडफोड केली. शुक्रवारी आंदोलकांनी मुर्शिदाबादमध्येच एका रेल्वे स्टेशनची तोडफोड केली होती. पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिकेवरही हल्ला केला होता. काही पोलीसही जखमी झाले होते.
CAB अर्थात नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात (Citizenship Amendment Bill) ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर विरोध दिसून येत आहे. या ठिकाणी जाळपोळ सुरुच असून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, आसाममध्ये परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. गुवाहाटी शहरात ब्रॉडबँड सेवा सुरु झाली आहे. मोबाइल इंटरनेट मात्र अजूनही बंदच आहे.
काही ठिकाणची संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. गुवाहाटी आणि दिब्रुगडमध्ये काही तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुवाहाटी शहरात सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तर दिब्रुगडमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरित्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात हा हिंसेचा आगडोंब उसळला. त्याची तीव्रता वाढतच गेली. गुवाहटी शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण तिनसुकिया, दिब्रुगड आणि जोरहाट या अप्पर आसामच्या भागामध्ये तणाव असून हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.