मुंबई : काही वर्षांपूर्वीच व्यावसायात पदार्पण करणाऱ्या अनमोल अंबानी यानं आपले वडील अनिल अंबानी यांची मोठी मदत केलीय. अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा अनमोल यानं सध्या आर्थिक दुविधेला तोंड देणाऱ्या आपल्या वडिलांसाठी मोठ्या रक्कमेची व्यवस्था केलीय. अनमोल अंबानी यांनी आपल्या करिअरमधली पहिलीच मोठी डील पक्की केलीय... ही डील तब्बल १७०० करोडोंची आहे. या पैशांतून अनिल अंबानींना आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे.
रिलायन्स कॅपिटलचे संचालक अनमोल अंबानी यानं आपली पहिली डील फायनल केलीय. ज्युनिअर अंबानीनं रिलायन्स ग्रुपची 'कोडमास्टर्स'मध्ये असलेले ६० टक्के समभाग १७०० करोड रुपयांना विकलेत. 'कोडमास्टर्स' ही एक ब्रिटिश गेम डेव्हलपिंग कंपनी आहे.
अनिल अंबानी यांच्या कंपनीनं २००९ साली 'कोडमास्टर्स'मध्ये गुंतवणूक केली होती. ९० टक्के समभाग विकत घेण्यासाठी त्यांनी तब्बल १०० करोड रुपये खर्च केले होते. अनमोलनं हेच समभाग आता २५ पटीनं जास्त परतावा घेऊन विकलेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, १७०० करोडमध्ये समभाग विकल्यानंतर आता रिलायन्सची या कंपनीत ३० टक्के शेअर शिल्लक आहेत... याचं बाजारमूल्य ८५० करोड रुपये आहे.
'कोडमास्टर्स' लंडन स्टॉक एक्सजेंज (LSE) मध्ये लिस्टेड कंपनी आहे. तीन दशकांपूर्वीची ही कंपनी १९८६ मध्ये सुरु झाली होती. कंपनीच्या चार शाखा आहेत. यामधील तीन ब्रिटन आणि चौथी मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये आहे. चार शाखांत जवळपास ५०० कर्मचारी काम करतात. वर्ष २०१६ ते २०१८ पर्यंत 'कोडमास्टर्स'चा रिव्हेन्यू जवळपास दुप्पट झालाय. दोन वर्षांत कंपनीचा रिव्हेन्यू ३१ मिलियनहून ६४ मिलियनवर पोहचलाय.
२६ वर्षीय अनमोलनं वारविक बिझनेस स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. २०१४ साली दोन महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यानं रिलायन्स ग्रुप जॉईन केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये तो रिलायन्स कॅपिटल बोर्डातही सहभागी झाला.
कर्ज न चुकवल्यानं रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स इन्फ्रटेल आणि रिलायन्स टेलिकॉम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यात. अंबानी कुटुंबातील छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे या कंपन्यांचे हक्क आहेत. अशा वेळी आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय. त्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणानं (NCLAT) अनिल अंबानींना दिलासा देत दिवाळखोरी प्रक्रियेवर रोख लावलीय.