Andra pradesh : Andra pradesh : कोरोनाच्या (Corona) काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. लहान-मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यानंतरही सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आंध्र प्रदेशातील (Andhra government hospital) नेल्लोर शहरातील सरकारी रुग्णालयात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ऑक्सिजनअभावी (oxygen supply) आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजनच्या कमतरतेचा ठपका मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर ठेवला आहे. आरोपांना उत्तर देताना रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्णालयाने आजारपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे.
आठ रुग्णांपैकी सहा रुग्णांना हॉस्पिटलच्या मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (MICU) वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात रुग्णालयाच्या अधीक्षकांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. इतर कारणांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी जिल्हा शासकीय रुग्णालयात आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर रुग्णालयाचे अधीक्षक सिद्धा नाईक यांनी आरोप फेटाळून लावत काही लोक रुग्णालयाबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचे सांगितले. रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनची कमतरता नाही असेही अधीक्षक सिद्धा नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू
एप्रिल 2021 मध्ये, नाशिक येथील एका रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. झाकीर हुसेन रुग्णालयामधील स्टोरेज टँकमध्ये ऑक्सिजनचा टँकर भरत असताना ही घटना घडली होता. सुमारे 30 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होती.
बस अपघातात सहा जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील वायएसआर जिल्ह्यात शनिवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. वायएसआर जिल्ह्यातील चिन्ना परिसरात बस आणि
ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.