'अनंतनाग आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर'

अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान शहीद तर इतर चार जण जखमी झाले.

Updated: Jun 13, 2019, 03:59 PM IST
'अनंतनाग आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर'  title=

नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच झाल्याचे विधान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरंस सेंटर ( SKICC) येथे एका खासगी विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कालचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या निर्देशावर केला गेला असून तो एक आत्मघाती हल्ला होता. जेव्हा काश्मीर घाटीमध्ये शांतता असते तेव्हा पाकिस्तान आत्मघाती हल्ला घडवत परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करते असे ते म्हणाले. अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान शहीद तर इतर चार जण जखमी झाले.

आम्ही राज्याच्या निवडणुका या शांततापूर्ण पार पाडल्या. हे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना रुचले नाही. जेव्हा सुरक्षाबळाची स्थिती पाकिस्तानला मजबूत दिसते तेव्हा आत्मघाती हल्ल्याचे फर्मान सोडले जाते. पण यावेळेस आमच्या निश्चयावर फरक पडणार नाही. आम्ही दहशतवाद संपवूनच दाखवू असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या आदेश आणि संगनमतानेच आत्मघाती हल्ला होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

अमरनाथ गुहेजवळील रस्त्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल यावेळी राज्यपालांना विचारण्यात आले. त्यावेळी हा हल्ला हा अमरनाथ यात्रेकरुंवर नव्हता. कारण यात्रा सुरु होण्यास वेळ आहे. आमच्याकडे यासाठी कडेकोट व्यवस्था आहे. आम्ही त्यांना (दहशतवाद्यांना) यात्रेकरुंच्या जवळही भटकू देणार नाहीत असे राज्यपाल म्हणाले.