Amit Shah on Congress: केंद्रात काँग्रेस (Congress-led UPA) सत्तेत असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी सीबीआयने आपल्यावर दबाव टाकला होता असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे. केंद्रीय यंत्रणांचा कथित गैरवापर होत असून विरोधक निषेध करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यावर भाष्य करताना अमित शाह यांनी हा आरोप केला आहे.
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असून यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिण्यात आलं आहे. याच आरोपावर अमित शाह एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
"केंद्रात काँग्रेस सरकार असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी सीबीआय वारंवार माझ्यावर त्यांना खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यास सांगत होती," असा दावा अमित शाह यांनी केला आहे. मात्र यानंतरही भाजपाने कधीही आरडाओरड केली नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधकांवर टीका करताना काही पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र आले असून 'भ्रष्टाचारी बचाव अभियान' राबवत आहेत असं म्हटलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
"भ्रष्टाचारात सहभागी असलेले सर्व चेहरे आता एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र येत आहेत," अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. पुढे ते म्हणाले की "आमच्या घटनात्मक संस्थांमुळे आमचा पाया मजबूत आहे. आज भारताला रोखण्यासाठी त्यावरच हल्ला केला जात आहे”.
काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या आपल्या नेत्यांविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका दाखल करुन घेतली असून 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
दरम्यान अमित शाह यांना राहुल गांधींना सूरत कोर्टाने दोषी ठरल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "कोर्टाने दोषी ठरवलेले आणि सदस्यत्व रद्द झालेले राहुल गांधी हे एकमेव नेते नव्हते". वरच्या कोर्टात जाण्याऐवजी राहुल गांधी उगाच आरडाओरड करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यासाठी दोषी ठरवत आहेत असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोष देण्याऐवजी वरच्या कोर्टात जावं असा सल्ला अमित शाह यांनी दिला आहे. "कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही असा काँग्रेस गैरसमज पसरवत आहे. कोर्टाने निर्णय दिल्यास शिक्षेला स्थगिती दिली जाऊ शकते. त्यांनी आपल्या शिक्षेवर स्थगितीसाठी आव्हान दिलेलं नाही. हा कसला अहंगंड अहंकार आहे? तुम्हाला खासदार म्हणून राहायचे आहे आणि कोर्टातही जाणार नाही," असं अमित शाह यांनी सांगितलं.