नवी दिल्ली : पारंपरीक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठीमध्ये कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रशासनाने प्रवेश नाकारला आहे. सध्या सण आणि उत्सवाचा काळ आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत प्रशासनाने हा प्रवेश नाकारला आहे.
राहुल गांधी ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत अमेठी दौऱ्यावर होते. प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसला एक पत्रचलिहिले आहे. या पत्रात सध्या मोहरम आणि दूर्गा पुजेचा उत्साह सुरू असल्यामुळे आपल्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दौरा पुढे ढकलण्यात यावा असे म्हटले आहे. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस हे बंदोबस्तामध्ये व्यग्र असणार आहेत. त्यामुळे आपल्या कार्यक्रमादरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, प्रशासनाने दौऱ्याला परवानगी नाकारण्यासाठी दिलेल्या कारणावरून कॉंग्रेस नाराज आहे. कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी या पार्श्वभूमीवर मत प्रतिक्रीया देताना प्रशासनाचे हे सर्व बहाने आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे सण उत्सवाच्या काळात. एका खासदाराला त्याच्या मतदारसंघात प्रवेश नाकारला जातो. ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.