मुंबई : मुकेश अंबानी, सुनिल भारती यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींच्या नोकरीवर संकट आलं आहे. सेबीनं बनवलेल्या नव्या नियमामुळे या उद्योगपतींना त्यांची नोकरी सोडावी लागू शकते. ३१ मार्च २०१९ पर्यंतच हे उद्योगपती सीएमडी पदावर राहू शकतात. हे संकट सीएमडी पदावर असलेल्या सगळ्यांवर आहे. सेबीनं दिलेल्या आदेशानुसार रियायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एअरटेल या कंपनीच्या बोर्डवर गैर कार्यकारी चेअरपर्सन बसवावा लागणार आहे. यासाठी कंपनीला चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरचं पद वेगळं ठेवावं लागणार आहे. १ एप्रिल २०२० पासून हा नवा नियम लागू होणार आहे.
डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार सेबीच्या नव्या नियमानुसार टॉप ५०० कंपन्यांना या आदेशाचं पूर्णपणे पालन करावं लागणार आहे. ज्या कंपनी या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. या ५०० कंपन्यांनंतर छोट्या कंपन्यांवरही अशाच प्रकारे नियम लागू करण्यात येणार आहे. नियमांचं पालन केलं नाही तर ठराविक कालावधीनंतर या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कंपन्यांनी सेबीचे नियम मानले नाहीत तर संबंधित चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालकाला बोर्डच्या कोणत्याही पदावर राहता येणार नाही.