'ऍमेझॉन' देणार नोकरीची संधी; भारतात २०,००० लोकांना मिळणार रोजगार

कोरोना व्हायरसमुळे  भारतातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.     

Updated: Jun 28, 2020, 07:59 PM IST
'ऍमेझॉन' देणार नोकरीची संधी; भारतात २०,००० लोकांना मिळणार रोजगार title=

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसमुळे  भारतातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अशात 'ऍमेझॉन'ने देशात २० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा रविवारी  केली आहे. कंपनीला कंत्राटी कामगारांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑनलाईन वस्तूंनी मागणी वाढल्यामुळे  कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं.

ऍमेझॉन इंडियाच्या वृत्तानुसार, ही तात्पुरती नियुक्ती नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, इंदूर, भोपाळ, लखनऊ, हैदराबाद, पुणे याठिकाणी करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 'व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस’ या योजनेच्या  अंतर्गत कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देखील देणार आहे. 

ऍमेझॉन इंडियाचे संचालक (ग्राहक सेवा) अक्षय प्रभु म्हणाले, 'ग्राहकांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कंपनीला कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या सहा महिन्यात ग्राहकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. शिवाय कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. त्यामुळे ऍमेझॉनच्या अशा लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.' असं ते म्हणाले.

ऍमेझॉन कंपनीसोबत काम करू इच्छीत असणारा उमेदवार किमान १२ पास असावा. शिवाय त्याला इंग्रजी, हिंदी, तेलगू, तामिळ किंवा कन्नड भाषेची चांगली माहिती असणे गरजेचे असणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी seasonalhiringindia@amazon.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा 1800-208-9900 वर कॉल करू शकतात.