महाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग

Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 6, 2023, 09:44 AM IST
महाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग title=
महाराष्ट्रातील संघर्ष आता देशपातळीपर्यंत जाणार आहे

Ajit Pawar vs Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरी नाट्यातील पुढील अंक आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगासमोर रंगणार असल्याचं बुधवारीच अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरुन स्पष्ट झालं आहे. गुरुवारी मुंबईमध्ये दोन्ही गटांच्या बैठकीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षासाठीचा आणि पक्षचिन्हासाठीचा वाद येणाऱ्या काही दिवसांमध्ये अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही पक्षाच्या अध्यक्षपदावरही अजित पवार दावा सांगणार असल्याची शक्यता असल्याने शरद पवारांनी आज तातडीने दिल्लीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे आता अजित पवार गटाने महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याबाजूने करुन घेण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत न राहता देशपातळीवर होईल अशी चिन्हं दिसत आहेत.

पटेल यांच्यावर सोपवण्यात आली जबाबदारी

शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनीही अजित पवार गटाला समर्थन अगदी पहिल्या दिवसापासूनच दिलं आहे. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच आता देशातील इतर राज्यांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा आणि तेथील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रामुख्याने गोवा, बिहार, कर्नाटकसहीत नागलॅण्डमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी पुढील काही दिवसांमध्ये अजित पवार चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. इतर राज्यांमधील पदाधिकाऱ्यांकडूनही हमीपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावरच सोपवण्यात येणार असल्याचं समजते. केंद्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या पटेल यांच्या खांद्यावरच राष्ट्रीय स्तरावर पक्ष बांधणी करुन जास्तीत जास्त पाठिंबा अजित पवार गटाला मिळवा यासाठी प्रयत्नशील असणार आहे. देशपातळीवरही अजित पवारांना जास्तीत जास्त राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रफुल्ल पटेल सक्रीय होणार असून सर्व जोर लावून प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्रातील 4 पैकी 3 खासदार शरद पवारांबरोबर

महाराष्ट्रातील 54 आमदारांबरोबरच केरळमध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. गुजरात आणि झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढवलेल्या 34 जागांपैकी महाराष्ट्रात 4 खासदार निवडूण आले आहेत. यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, रायगडमधून सुनील तटकरे, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे. यापैकी सुनील तटकरे हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. तसेच लक्षद्वीपमधूनही पी. पी. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.