मुंबई : जगात अनेक प्रकारची वाहने आहेत. कारपासून विमानापर्यंत सर्व लहानमोठ्या वाहनांना टायर असतात. वाहनाचा रंग कोणताही असो, पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे या वाहनांच्या टायरचा रंग. सर्व वाहनांच्या टायरचा रंग काळा असतो. पण टायरचा रंग फक्त काळाच का असतो असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
छोटी कार असो किंवा मोठे विमान, प्रत्येकाचे टायर काळ्या रंगाचे असतात. 1917 पूर्वी, सर्व टायर बेज, म्हणजे ऑफ-व्हाइट रंगाचे असायचे. नंतर सर्व टायर्सला काळा रंग आला.
एका रिपोर्टनुसार 1917 पूर्वी टायर्सचा रंग पांढरा असायचा. ते टायर नैसर्गिक रबरापासून बनविलेले होते. त्यामुळे टायरचे वजन खूपच कमी होते. वाहनांमध्ये हलके टायर वापरले जात होते. त्यांना मजबूत करण्यासाठी त्यांच्या आत झिंक ऑक्साईडचा वापर करण्यात आला. तरीही, मजहूती कमी असल्याने कार कंपन्यांनी इतर टायरचा पर्याय शोधला.
कार कंपन्यांनी टायर बदलण्यासाठी अनेक विनंत्या केल्या. नैसर्गिक रबराचे सूर्यप्रकाशामुळे नुकसान होत असे. टायरमध्ये भेगा पडत असत. त्यामुळे त्यांना बळकट करण्यासाठी त्यात कार्बन मिसळला गेला. कार्बन सूर्याच्या अतिनील किरणांना रोखतो. त्यामुळे त्यांचे आयुर्मान वाढते. तसचे रस्त्यावर धावताना, कट आणि फाटण्याची भीती कमी होते. त्यात कार्बन मिसळल्याने टायरचा रंग काळा झाला.