'बलात्कार, दरोडे, लूटमारी... सगळ्यात मुस्लिम 1 नंबर,' AIUDF खासदार बदरुद्दीन अजमल असं का म्हणाले? स्वत: केला खुलासा

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आपण हे विधान नेमकं का केलं? यामागील कारणांचा उलगडा त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 31, 2023, 01:13 PM IST
'बलात्कार, दरोडे, लूटमारी... सगळ्यात मुस्लिम 1 नंबर,' AIUDF खासदार बदरुद्दीन अजमल असं का म्हणाले? स्वत: केला खुलासा title=

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानावरुन मोठा गदारोळ माजला आहे. "आपण (मुस्लीम) चोरी, दरोडे, लूटमारी...असा सर्व गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. आपण जेलमध्ये जाण्यातही पहिल्या क्रमांकावर आहोत," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान आपण नेमकं असं विधान का केलं? त्यामागील कारण काय याचा खुलासा बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे. 

'इंडिया टुडे'शी संवाद साधताना बदरुद्दीन अजमल यांनी आपल्या विधानामागील कारण सांगितलं. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "मी जगभरातील मुस्लीम समाजात शिक्षणाची कमतरता पाहिली आहे. आपली मुलं शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, शिकत नाही हे पाहून फार वाईट वाटतं. ही मुलं मोठ्या शिक्षणासाठी प्रयत्न करत नाहीत. इतकंच नाही तर मॅट्रिकपर्यंतही शिकत नाहीत. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावण्यासाठीच मी हे बोललो होतो".

"मुलींना पाहिल्यानंतर आपलं रक्त उसळतं असं तरुणांचं म्हणणं आहे. या तरुणांना मला सांगायचं आहे की, जर आपण बाजारात चालत असून, तर नजर खाली झुकलेली असावी असं इस्लाम सांगतो. जर आपण मुलींकडे वाईट नजरेने पाहत असू, तर आपल्या घऱातही आई-बहिणी आहेत याची माहिती असली पाहिजे. जर तुम्ही याचा विचार केला तर मनात वाईट विचार येणार नाहीत," असं ते म्हणाले आहेत.

बदरुद्दीन अजमल नेमकं काय म्हणाले होते?

20 ऑक्टोबरला आसामच्या गोलापारा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये संबोधित करताना बदरुद्दीन यांनी मुस्लिम समाजातील लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी मुस्लिमांमध्ये असाक्षरतेला गुन्हेगारीशी जोडलं होतं. 

त्यांनी सांगितलं होतं की, "चोरी, दरोडे, बलात्कार आणि लूटमारी...या सगळ्या आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. आपल्या मुलांकडे शाळेत-कॉलेजात जाण्यास वेळ नाही. पण जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठी वेळ आहे. अशा सर्व चुकीच्या गोष्टींसाठी स्वत:ला विचारणा करा की, यात कोण सहभागी आहे. हे मुसलमान आहेत आणि याचं दु:ख आहे".   

लोक सूर्य, चंद्रावर जात असताना, आपण मात्र जेलमध्ये कसं जायचं याची पीएचडी करत आहोत. पोलीस स्टेशनमध्ये जावा म्हणजे तुम्हाला कळेल. अब्दुर रहमान, अब्दुर रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजुद्दीन, फखरुद्दीन....हेच जास्त आहे. ही दुखावणारी गोष्ट नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली होती. 

याआधी त्यांनी जेव्हा पोट आणि खिसा रिकामी असतो तेव्हा प्रेमही चांगलं वाटत नाही. एका भुकेल्या व्यक्तीसह कधीपर्यंत प्रेम करणार? असंही म्हटलं होतं.