निर्मला सितारामन यांच्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे कांद्यावर विधान

किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय.

Updated: Dec 5, 2019, 06:13 PM IST
निर्मला सितारामन यांच्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे कांद्यावर विधान  title=

नवी दिल्ली : कांद्याच्या वाढलेल्या किंमतींचा प्रश्न देशासमोर उभा राहिला असताना केंद्रातील नेते यावर बेजबाबदार वक्तव्य करत असल्याचे समोर येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळापैकी आणखी एका नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. देशभरात कांद्याच्या किंमतींनी शंभरी कधीच ओलांडलीय. किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय.

मी शाकाहारी आहे. मी कांदे खात नाही असे विधान केंद्रीय मंत्री अश्विन चौबे यांनी केले आहे. मला कांद्याच्या किंमतींबद्दल काही माहीत नाही. मग मी कसे बोलू ? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

कांदे-लसणाचा वाढलेल्या भावांचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला. यावेळी बोलताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 'चिंता करू नका... मी जास्त कांदे - लसूण खात नाही' असं म्हणतानाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. यावरून निर्मला सीतारमण यांना टीकेचं धनीही व्हावं लागले आहे.

'राजकारण तापलं'

कांद्याच्या वाढत्या दरावरून राजधानी दिल्लीतलं राजकारण ही तापलं आहे. काँग्रेसनं कांदा दरवाढीवरून केंद्र सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केलाय. त्यासाठी काँग्रेसनं संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लोकसभेतल्या विधानाचाही निषेध करण्यात आला. आपण कांदा खात नाही त्यामुळे आपला कांद्याशी संबंध नसल्याचं वादग्रस्त विधान निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या दरवाढीच्या चर्चेदरम्यान केलं होतं. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी चांगलीच टीका केली.

'निर्णय आत्मघातकी'

कांद्याचे भाव वाढून दोन महिने झाले. मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, सरकारचा हा निर्णय आत्मघातकी आहे. तुर्कस्तानमधून ११ हजार टन कांदा आयात केल्यानंतर बाजारपेठत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळतील, अशी भिती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठ येत असताना सरकार आत्ता का कांदा आयात करत आहे. ग्राहकाला दिलासा द्यायचा होता तर आधीच का कांदा आयात केला नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे.