इस्लमाबाद : करतारपूर कॉरिडोर लवकरात लवकर पूर्ण व्हावा या विषयावर भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये उद्या (रविवार, १३ जुलै २०१९) एक बैठक होणार आहे. या बैठकीआधी पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी गोपाल चावलास पाकिस्तानच्या शिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटीतून हटविण्यात आले आहे. गोपाल सिंह चावला हा आता गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा सदस्य देखील नसणार आहे. पाकिस्तानच्या शिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नगर किर्तनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. २५ जुलैला ननकाना साहिब यांचे किर्तन आहे.
करतारपूर कॉरिडोर लवकर व्हावा यासाठी भारत आग्रही आहे. ३१ ऑक्टोबरच्या आत हे काम पूर्ण व्हावे हे उद्दीष्ट आहे. तसेच भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी देखील भारत आग्रही आहे. करतारपूर कॉरिडोर कमेटीमध्ये गोपाल सिंह चावलास सहभागी केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरून भारताने मागची मिटींग रद्द केली होती. आता अटारी बॉर्डरवर सुरु होणाऱ्या बैठकीआधीच पाकिस्तान सरकारने गोपाल सिंह चावला यास बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
गोपाल सिंह चावला हा पाकिस्तानात बसलेला भारताचा कट्टर विरोधक आहे. दहशतवादी हाफिज सईद आणि जैश सरगना मसूद अजहरशी त्याचे संबंध आहेत. पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआय ( ISI) च्या अधिकाऱ्यांचाही तो खास आहे. पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्ध यांच्या गोपाल चावला सोबतचा फोटोवर देशभरातून टीका झाली होती.