Kashi-Mathura Dispute : अयोध्या तो झांकी है, कांशी-मथुरा बाकी है. ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरताना दिसतेय. मंदिर-मशिदीच्या वादात अयोध्या आणि वाराणसीनंतर आता मथुरा राजकारणाचं नवं केंद्र बनलंय. मथुरेतील शाही ईदगाह मशिदीची जागा श्रीकृष्ण जन्मभूमी देवस्थान ट्रस्टला द्या अशी मागणी याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांनी केली आहे.
काय आहे मागणी ?
याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांच्या मालकीची एकूण 13.37 एकर जमीन आहे. यापैकी 11 एकरात श्रीकृष्णाचं जन्मस्थान मंदिर आहे. तर 2.37 एकर जमिनीवर शाही ईदगाह मशिद आहे. ही 2.37 एकर जमीन मोकळी करून श्रीकृष्ण जन्मस्थानाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय. विशेष म्हणजे कोर्टानं त्यांची याचिका स्वीकारली असून याप्रकरणी येत्या 1 जुलैला सुनावणी होणाराय...
काशी आणि मथुरेचा वाद हा जवळपास अयोध्येसारखाच आहे. त्यामुळे चांगलाच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
काय आहे मथुरेचा वाद ?
काशी आणि मथुरेत औरंगजेबानं हिंदूंची मंदिरं तोडून मशिदी बनवल्या, असा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबानं 1670 मध्ये मथुरेतील भगवान श्रीकृष्णाचं मंदिर तोडलं आणि त्याठिकाणी ईदगाह मशीद बांधण्यात आली, असा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. ब्रिटिशांनी 1815 साली बनारसचे राजे पटनीमल यांना लिलावात ही जमीन विकली.
मात्र 1920 ते 1930 च्या दशकात मुस्लिमांनी लिलावात विकलेल्या जमिनीत ईदगाह मशीद ट्रस्टचा हिस्सा असल्याचा दावा केला. तर ज्या भागात ईदगाह मशीद आहे तिथं कंसाचा तुरुंग होता,असा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय. त्यामुळे या जागेचा मालकी हक्क मिळावा अशी मागणी करण्यात येतेय.
गेल्यावर्षी हिंदू महासभेनं ईदगाह मशिदीत भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मथुरा की बारी हा नारा प्रचारात गाजला. आता हा वाद पुन्हा एकदा कोर्टात गेलाय. त्यामुळं अयोध्या, काशीप्रमाणेच मथुरेवरूनही यादवी पेटणार एव्हढं मात्र नक्की.