Indian Businessman Inspirational Story: भांगार खरेदी विक्रीचा व्यवसाय ते 16 हजार कोटींचा मालक किंवा एकूण 1 लाख 48 हजार 729 कोटींचा उद्योगाचा डोलारा उभा करणारी व्यक्ती असा प्रवास करणारी भारतीय व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? याच उद्योजकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतामधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल (Anil Agarwal)! ब्रिटनमधील केंम्ब्रीज विद्यापीठामध्ये नुकतेच अनिल अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. वेदान्ता रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अनिल अग्रवाल हे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात अचानक चर्चेत आले ते वेदान्ता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला. यावेळेही अनिल अग्रवाल यांनी आपलं म्हणणं ठामपणे मांडलं होतं.
एका छोट्या उद्योजकाच्या घरात बिहारमधील पाटण्यात अनिल अग्रवाल यांचा जन्म झाला. अग्रवाल हे मारवाडी कुटुंबातील होते. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षीच वडिलांना उद्योगामध्ये हातभार लावत असतानाच मुंबई गाठली. एकीकडे वडिलांना मदत करतानाच दुसरीकडे आपल्याला आपला एखादा उद्योग सुरु करता येईल का यासंदर्भात खटाटोप अनिल अग्रवाल यांनी सुरु केला. सध्या खाणकाम आणि इलेक्ट्रीक क्षेत्रातील मोठे उद्योजक असलेल्या अनिल अग्रवाल यांनी 1970 साली भंगार खरेदी विक्रीच्या व्यवसायाने आपल्यातील उद्योजक पहिल्यांदा आजमावून पाहिला. केंम्ब्रीज विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनिल अग्रवाल यांनी या आठवणींना उजाळा दिला. "मी माझ्या वयाच्या विशीत तसेच तिशीमध्ये फार धडपडत होतो. मी इतरांकडे पाहून आपण इतकं यशस्वी कधी होणार, आपण त्यांच्या ठिकाणी कसे असू याचा विचार करायचो. विशेष म्हणजे 9 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये अपयश आल्यानंतर आणि अनेक वर्ष या ताणतणावामध्ये गेल्यानंतर मला माझ्या पहिल्या स्टार्टअपमध्ये यश आलं," असं अनिल अग्रवाल यांनी केंम्ब्रीजमधील विद्यार्थ्यांना सांगितलं.
जो स्वत: कधी कॉलेजला गेला नाही अशा व्यक्तीला केंम्ब्रीजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलणं हे एखाद्या स्वप्नासारखं आहे, असंही अनिल यांनी केंम्ब्रीजमधील आपला एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे. "मला अनेक विशीमधील तरुणांना चारही बाजूंनी घेरलं होतं. हे माझ्याशी हस्तांदोलन करत होते. चेहऱ्यावरील मोठ्या हास्यासहीत ते स्वत:ची ओळख करुन देत होते. मला आठवतंय मी त्यांच्या वयाचा होतो तेव्हा थोडा लाजायचो आणि घाबरायचोही. मी कधीच स्वत:ला छान पद्धतीने सादर करु शकलो नाही. मी फार तोडकं इंग्रजी बोलायचो. या मुलांचा आत्मविश्वास पाहून मलाचा प्रेरणा मिळाली," असं अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
"मी माझी कंपनी कशी सुरु केली, मी मोठमोठ्या डिल्स कशा करतो याबद्दल मला विचारण्यात आलं. मात्र माझ्या या यशाचं रहस्य माझ्या अपयशांमध्येच आहे. 9 उद्योगांमध्ये अपयश आल्यानंतर माझं पहिलं स्टार्टअप यशस्वी ठरलं. मी त्यांना केवळ कधी हार मानू नका हा एकमेव संदेश मी देऊन आलो. तुम्हाला यासाठी पदवीची, आर्थिक पाठबळ असलेला कौटुंबिक वारसा असल्याची किंवा चांगल्या इंग्रजीची गरज यशस्वी होण्यासाठी नसते. अर्थात या गोष्टी तुम्हाला मदत करतात. मात्र या प्रवासात सर्वात परिणामकारक गोष्ट ठरते ती तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल किती खंबीर आहात. थोडे हट्टी व्हा आणि निर्भय व्हा," असंही अनिल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
As someone who never went to college, being invited to cambridge university and speaking with the students was nothing short of a dream…
I was surrounded by bright 20 year olds who firmly shook my hands and introduced themselves with a big smile…i remember when i was their… pic.twitter.com/GpeOqqnCWM
— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) June 23, 2023
उद्योगजगातबरोबरच अनिल अग्रवाल हे सोशल मीडियावरील त्यांच्या प्रेरणादायी पोस्टसाठीही ओळखले जातात. त्यांचे ट्वीटरवर 1 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. 'फोर्ब्स'च्या आखडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 16 हजार कोटी इतकी आहे. तर त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 32 हजार कोटी इतकी आहे. त्यांनी 1 लाख 48 हजार 729 कोटींचा उद्योगाचा डोलारा उभाला असून तो यशस्वीपणे हाताळत आहेत.