बापानेच मुलीला ठार करत पंख्याला लटकवलं; ऐकताच प्रियकराची ट्रेनसमोर उडी; 'सैराट'पेक्षा भयंकर घटना

Crime News: आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याचं समजल्यानंतर संतप्त झालेल्या बापाने मुलीची हत्या (Murder) केली. आधी त्याने मुलीचा गळा दाबला, नंतर मुलीचा मृतदेह पंख्याला लटकवला.   

शिवराज यादव | Updated: Jun 28, 2023, 04:12 PM IST
बापानेच मुलीला ठार करत पंख्याला लटकवलं; ऐकताच प्रियकराची ट्रेनसमोर उडी; 'सैराट'पेक्षा भयंकर घटना title=

Crime News: कर्नाटकात (Karnataka) ऑनर किलिंगची (Honour Killing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याने बापानेच तिची गळा दाबून हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण संतप्त पित्याने त्यावेळी फक्त आपल्या मुलीचीच नाही तर तिच्या प्रियकराचंही जीवन संपवलं. कारण आपल्या 20 वर्षीय प्रेयसीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर तिच्या प्रियकराने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. 

कृष्णमूर्ती असं आरोपी पित्याचं नाव आहे. कोलार गोल्ड फिल्डमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती याचं नेहमी त्यांची मुलगी किर्ती हिच्याशी भांडण होत होतं. याचं कारण किर्तीला 24 वर्षीय गंगाधरशी लग्न करायचं होतं. पण तो दुसऱ्या जातीतील असल्याने कृष्णमूर्ती याचा विरोध होता. 

कृष्णमूर्ती वारंवार आपल्या मुलीचं मन वळवत तिने नातं संपवावं यासाठी प्रयत्न करत होता. मंगळवारी सकाळीही त्याने किर्तीला गंगाधरशी असणारे सर्व संबंध तोडण्यास सांगितलं. पण यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भांडण इतकं टोकाला गेलं की, कृष्णमूर्ती याने किर्तीची हत्या करुन टाकली. कृष्णमूर्ती याने किर्तीचा गळा दाबून तिला ठार केलं. यानंतर त्याने तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपीने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांना मृतदेह पाहिल्यानंतर शंका आली आणि त्यांनी कृष्णमूर्तीची चौकशी सुरु केली. पोलिसांना सुरुवातीपासूनच हत्या झाली असावी असा संशय होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्तीचा प्रियकर गंगाधर गवंडीकाम करायचा. त्याला किर्तीच्या मत्यूची बातमी मिळाल्यानंतर तो अस्वस्थ होता. यानंतर त्यानेही आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने रेल्वे स्थानक गाठलं आणि ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. 

दरम्यान पोलिसांनी आरोपी कृष्णमूर्तीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत त्याला अटक केली असून तपास सुरु आहे.