'राम मंदिर बांधलं जात असताना सीतेला जाळलं जातंय'

लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला.

Updated: Dec 6, 2019, 02:22 PM IST
'राम मंदिर बांधलं जात असताना सीतेला जाळलं जातंय' title=

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला. एकीकडे राम मंदिर बांधलं जात असताना दुसरीकडे सीतेला जाळलं जातंय, असं वक्तव्य काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलं. अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार आक्रमक झाले. स्मृती इराणी यांनी अधीर रंजन चौधरींच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. बलात्काराला सांप्रदायीक रंग देणारे आज भाषण देत आहेत, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

अधीर रंजन चौधरी यांनी हैदराबाद सामूहिक बलत्कार आणि उन्नाव बलात्कार पीडित महिलेला जीवंत जाळण्याच्या प्रकारावर लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. उन्नावमधली बलात्कार पीडित ९५ टक्के जळली आहे. देशामध्ये काय सुरु आहे? असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला. उन्नाव प्रकरणी काँग्रेस खासदारांनी वॉकआऊट केलं.

महिलांच्या विषयाला सांप्रदायीक विषयाशी जोडणं चुकीचं आहे. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय शस्त्र म्हणून वापरण्यात आलं. आज बंगालचे खासदार इकडे मंदिराचं नाव घेत आहेत. ज्या लोकांनी बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं तेच आज भाषण देत आहेत. त्यांनी तेलंगणा आणि उन्नावचं नाव घेतलं पण मालदा विसरले, असं विधान स्मृती इराणी यांनी केलं.

उन्नाव आणि तेलंगणामध्ये जे झालं ते लज्जास्पद आहे. दोषींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. यावर राजकारण होऊ नये, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणींनी लोकसभेमध्ये दिली.