नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. परंतु बुधवारी (10 ऑगस्ट) राज्यसभेत परिस्थिती अधिकच बिघडली आणि विरोधी खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा सभापती एम. व्येंकैय्या नायडू गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई करू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यसभेचे सभापती एम. व्येंकैया नायडू (M. Venkaiah Naidu) लवकरच यावर निर्णय घेऊ शकतात. मागील काही उदाहरणे आणि कृती पाहता हे प्रकरण एकतर विशेषाधिकार समितीकडे पाठवू शकतात किंवा नवीन समिती देखील स्थापन केली जाऊ शकते.
विरोधी पक्षातील खासदारांनी बुधवारी राज्यसभेत गोंधळ घातला. राज्यसभेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून येते की, खासदार वेलमध्ये येत असताना मार्शलनी खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, कारण खासदार स्पीकरच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, खासदार महिला मार्शलला धक्काबुक्की करत आहेत.
याआधी मंगळवारी (10 ऑगस्ट) राज्यसभेत विरोधी खासदारांनीही गोंधळ घातला आणि टेबलवर चढले. विरोधी खासदारांचा गोंधळ सुमारे दीड तास चालला. नंतर, मार्शलने या लोकांना बाहेर काढले आणि त्यानंतर कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. मात्र, सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर या सदस्यांनी पुन्हा टेबलवर चढून गोंधळ सुरू केला. विरोधी पक्षाचे अनेक सदस्य निषेध करण्यासाठी काळे कपडे आणि काळे मुखवटे घालून आले.
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती एम व्येंकैय्या नायडू बुधवारी राज्यसभेतील घटनेवर भावूक झाले आणि विरोधकांच्या वर्तनाचा निषेध केला. व्येंकैया नायडू यांनी मंगळवारच्या घटनेचा संदर्भ देत सांगितले की, कृषी कायद्यांचा निषेध करताना खासदार सभागृहाच्या टेबलावर चढले. यामुळे राज्यसभेचे सर्व पावित्र्य गमावले गेले. याबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, 'कालच्या घटनेमुळे मी खूप दुखावलो आहे, मी रात्री झोपू शकलो नाही.'