करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवल्यानंतर महिलेने त्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पतीच्या जेवणात विष मिसळून त्याला ठार केलं. कौशंबी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय शैलेश कुमारला त्याची पत्नी सविताने विष देऊन ठार केलं. त्याचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्याने पत्नीने हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सविताने करवा चौथच्या निमित्ताने शैलेशच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवला होता. दुसरीकडे शैलेशही सकाळपासून याच्या तयारीत व्यग्र होता. रात्री सविता उपवास सोडत असतानाच तिचं आणि पतीचं जोरदार भांडण झालं. मात्र काही वेळातच सर्व गोष्टी सामान्य झाल्या होत्या.
सविता आणि शैलेश यांनी एकत्र जेवण केलं. यानंतर सविताने शैलेशला शेजाऱ्यांकडून काहीतरी आणण्यास सांगितलं. शैलेश घरातून बाहेर जाताच संधीचा फायदा घेत तिने पळ काढला. यादरम्यान शैलेश बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. शैलेशचा भाऊ अखिलेश याने सांगितलं आहे की, ‘त्याला रुग्णालयात नेलं होतं. यावेळी मी व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये शैलेश सविताने आपल्याला विष दिल्याचं सांगत आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला’.
पोलिसांनी घटनेनंतर सविताला अटक केली आहे. कौशंबीचे पोलिस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले, "गुन्ह्याची नोंद इस्माईलपूर गावातून झाली आहे. भांडण झाल्यानंतर महिलेने पतीला विष पाजले. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, महिलेला अटक करण्यात आली आहे आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे."