मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि 2 मुलांना भीक मागायला लावत लाखो रुपये कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या मालकीची जमीन आणि दोन मजली घर आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2024, 01:09 PM IST
मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले title=

मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपल्याच पोटच्या मुलांना भीक मागायला लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि दोन मुलांनी रस्त्यांवर भीक मागायला लावत 44 दिवसांत तब्बल 2 लाख 50 हजार रुपये कमावले. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन आणि दुमजली घर आहे अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. शहरात भीक मागणाऱ्या 150 जणांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या असून, तिची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

"इंद्राबाई इंदूर-उज्जैन रोडवर लव-कुश इंटरसेक्शन येथे भीक मागताना आढळली. आम्हाला तिच्याकडे 19 हजार 200 रुपये सापडले आहेत," अशी माहिती प्रवेश या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष रुपाली जैन यांनी दिली आहे. प्रवेश ही संघटना शहरातील व्यवस्थापनासह शहर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
 
इंद्राबाई हिला पाच मुलं आहेत. तिने आपल्या तीन मुलांना भीक मागण्यास भाग पाडलं होतं. यामध्ये तिच्या 8 वर्षीय मुलाचाही सहभाग होता. शहरातील रस्त्यांवर ही मुलं भीक मागत होते. मुलीची सुटका केल्यानंतर तिला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्या तिची दोन मुलं ज्यांचं वय 9 आणि 10 आहे त्यांनी टीमला पाहून पळ काढला. महिलेची इतर मुलं राजस्थानात आहेत. 

इंद्राबाईने दिलेल्या माहितीनुसार, तिने 45 दिवसांत 2.5 लाख रुपये कमावले. यामधील 1 लाख रुपये तिने सासू-सासऱ्यांना पाठवले आहेत. तसंच 50 हजार रुपये बँक खात्यात डिपॉझिट केले आहेत. आणि 50 हजार रुपये एफीमध्ये गुंतवले आहेत. महिलेच्या कुटुंबाची राजस्थानमध्ये जमीन आणि दुमजली घर आहे अशी माहिती रुपाली जैन यांनी दिली आहे. 

"इंद्राच्या पतीने तिच्या नावे एक दुचाकी खरेदी केली होती. या दुचाकीवरुन ते संपूर्ण शहरात फिरायचे," असं रुपाली जैन यांनी सांगितलं आहे. 

अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर इंद्राने महिला एनजीओ कर्मचाऱ्याशी वाद घातला. यानंतर तिला 151 कलमांतर्गत अटक करण्यात आली अशी माहिती बाणगंगा पोलीस ठाण्याचे उप-निरीक्षक ईश्वरचंद्र राठोड यांनी दिली आहे. महिलेला सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांनी तिला न्यायालयीन कोठडी सुनावली, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने इंदूरसह 10 शहरं भिकारीमुक्त करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. इंदूरचे जिल्हादंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले, "शहरात भीक मागायला लावलेल्या मुलांची सुटका करण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे. आतापर्यंत 10 मुलांची सुटका करून त्यांना सरकारी बालगृहात पाठवण्यात आलं आहे".  मुलांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या टोळ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.