Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आझाद नगरमधील प्रयाग इंटर कॉलेज हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. याच रागातून तो चाकू घेऊन शाळेत पोहोचला होता. यानंतर त्याने वर्गात त्याची गळा कापून हत्या केली. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयाग इंटर कॉलेजच्या हायस्कूलमध्ये शिकणारा 15 वर्षीय विद्यार्थी निलेश तिवारी याचं आपला वर्गमित्र राजवीर यादवशी काही कारणावरुन भांडण झालं होतं. यानंतर राजवीर यादव सोमवारी आपल्या बॅगेत चाकू लपवून शाळेत पोहोचला होता.
शाळेत पोहोचल्यानंतर राजवीर यादवने चाकूने निलेशवर हल्ला केला. राजवीरने निलेशच्या पोट आणि मानेवर अनेक वार केले. वर्गातील हे चित्र पाहून इतर विद्यार्थी प्रचंड घाबरले. यानंतर विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरु झाली आणि गोंधळ उडाला. नेमकं काय झालं आहे, हे पाहण्यासाठी शिक्षक वर्गात पोहोचले असता निलेश तिवारी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला होता.
शिक्षकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमी अवस्थेत निलेशला रुग्णालयात नेलं होतं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. हत्येमागे नेमकं काय कारण होतं याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी आणि पीडित 10 वीच्या वर्गात एकत्र शिकत होते.
राजधानी दिल्लीही (Delhi) दोन हत्यांनी हादरली आहे. दिल्लीचा उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरात (Malviya Nagar) भरदिवसा एका मुलीची हत्या (Murder) करण्यात आली. त्याआधी डाबरी परिसरात एका बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवीय नगरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये (Kamla Nehru College) शिकणारी 22-23 वर्षांची मुलीवर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर मार लागल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी फरार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. कॉलेज आणि आसपासच्या परिसरात पोलीस चौकशी करत आहेत. मृत मुलीचं कोणाबरोबर वैर होतं का, प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली आहे का, या दिशेने तपास सुरु आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले जात आहेत.