उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका 20 वर्षीय तरुणीने आपल्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करत रस्त्यावर सर्व कपडे काढले. ही तरुणी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी अखेर 17 दिवसांनी 22 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. जम्मूमधील इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो एमटेक करत आहे. मंगळवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थिनीने निराशेतून हे कृत्य केलं. तिला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथे 3 दिवस निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “आम्ही आरोपीला पुढील तपासासाठी आग्र्याला बोलावलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला अटक केली". पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्याने आग्रा येथील विद्यापीठातून बीटेक पूर्ण केले.
स्थानिक पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, लखनौ येथील तरुणीने आरोप केला आहे की, 10 ऑगस्टच्या संध्याकाळी आरोपीने चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. तिच्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला एफआयआर दाखल करण्यात आला असला तरी, पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला नाही असा आरोप आहे. घटना घडली तेव्हा आरोपी जम्मूमध्ये होता असा दावा करून अटक टाळण्यात आली होती.
यादरम्यान तरुणी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत होती. कारवाई होत नसल्याने हताश झालेल्या, तरुणीने अधिकाऱ्यांना प्रकरणाकडे लक्ष देण्यास भाग पाडण्यासाठी रविवारी सार्वजनिकरित्या कपडे उतरवण्याचा निर्णय घेतला.
तरुणीने केलेलं हे निषेध आंदोलन पाहिलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं की, “महिलेने दुपारी रस्त्यावर स्वत:चे कपडे उतरवले आणि पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. दोन महिला पटकन तिच्या मदतीला आल्या आणि तिला कपड्याने झाकलं. त्यांनी तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. आम्हाला वाटलं की ती कदाचित मानसिकदृष्ट्या व्यथित असावी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला मानसिक रुग्णालयात नेलं".
रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं आहे की, "तिला रविवारी संध्याकाळी येथे दाखल करण्यात आलं. आम्ही तिला तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवले. या काळात आम्ही सकाळपासून झोपेपर्यंत तिच्या दैनंदिन हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं. आम्हाला काहीही असामान्य आढळलं नाही. मंगळवारी तिला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.