14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात 2 मुलं... परिस्थितीवर मात करत बनल्या IPS अधिकारी

IPS N. Ambika Success Story : अवघ्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी लग्न करुन दिलं. पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत एन अंबिका या महिलेने शिक्षण घेत थेट यूपीएससीची कठिण परीक्षा पास केली. आता अंबिका आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. 

राजीव कासले | Updated: Aug 28, 2024, 06:03 PM IST
14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात 2 मुलं... परिस्थितीवर मात करत बनल्या IPS अधिकारी title=

IPS N. Ambika Success Story : इच्छा असेल आणि कठोर मेहनतीची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यश मिळवता येतं. हेच सिद्ध करुन दाखवलंय आयपीएस एन अंबिका (N Ambika) यांनी. एन अंबिका यांची कहाणी आता अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तामिळनाडूत राहाणाऱ्या एन अंबिका यांचा बालविवाह झाला. अवघ्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलबरोबर त्यांचं लग्न लावून दिलं. 18 व्या वर्षात त्या दोन मुलींच्या आई बनल्या. पण शिकण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. खूप शिकायचं आणि मोठं अधिकारी व्हायचं हे त्यांचं स्वप्न होतं.

स्वप्नाच्या दिशेने सुरुवात
मोठं अधिकारी बनण्याच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली ती प्रजासत्ताक दिनाच्या परेडपासून.  26 जानेवारीच्या परेडला त्या उपस्थित होत्या. परेडमध्ये एक आयपीएस अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अंबिका यांचे पती परेडमध्ये सहभागी झाले होते. परेड करताना पोलिसांनी आयपीएएस अधिकाऱ्याला सॅल्यूट केला. हाच क्षण अंबिका यांना नवी उर्जा देणारा ठरला. त्याच क्षणी अंबिका यांनी आयपीएस अधिकारी (IPS) होण्याचा मनाशी निश्चय केला. 

यानंतर अंबिका यांनी एका खासगी संस्थेतून दहावी आणि बारावीचं शिक्षक पूर्ण केलं. चांगल्य मार्काने उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं. यूपीएससीचं शिक्षण घेण्यासाठी त्या चेन्नईला रवाना झाल्या. यात त्यांच्या पतीची त्यांना मोठी साथ लाभली. अंबिका यांच्या पतीने नोकरीबरोबरच दोन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी स्विकारली आणि अंबिका यांना शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं. 

तीन वेळा अपयशी
पण हा प्रवास इतका सोप नव्हता. यूपीएससी परीक्षेत त्यांना तीनवेळा अपयश आलं.  पतीने त्यांना घरी परतण्याचा सल्ला दिला. पण अंबिका आपल्या निश्चयावर अढळ राहिल्या. 2008 मध्ये त्यांनी चौथ्यंदा यूपीएससीची परीक्षा दिली. म्हणतात ना इच्छा असेल तर मार्गही मिळतो. अंबिका यांच्याबाबतीत हेच घडलं. चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आता त्या आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. 

विद्यार्थ्यांना सल्ला
अंबिका यांनी आपल्या यशाचा कानमंत्र दिला आहे. नेहमी मोठं स्वप्न पाहा तसंच इच्छा आणि कठोर मेहनतीची तयारी ठेवा. जगात दररोज घडणाऱ्या बातम्यांची माहिती घेण्यासाठी न्यूज पेपर वाचण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करण्याचा सल्लाही त्या देतात.