मजुरांना सापडली सोन्याची 240 नाणी, 7 कोटींच्या सोन्याचं कोडं; कुटुंब म्हणतंय "नसती सापडली तर बरं झालं असतं"

एका मजूर कुटुंबाला सोन्याची तब्बल 240 नाणी सापडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत तब्बल 7 कोटी 20 लाख रुपये आहे. मात्र ही सगळी नाणी पोलिसांनी लुटून नेल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. एक नाणं गुजरातच्या वलसाडमध्ये सापडलं होतं. त्यामुळे मध्य प्रदेश आणि गुजरात असे दोन्ही राज्याचे पोलीस या प्रकऱणाचा तपास करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 25, 2023, 02:10 PM IST
मजुरांना सापडली सोन्याची 240 नाणी, 7 कोटींच्या सोन्याचं कोडं; कुटुंब म्हणतंय "नसती सापडली तर बरं झालं असतं" title=

मध्य प्रदेशात एका आदिवासी कुटुंबाला सोन्याची तब्बल 240 नाणी सापडली होती. मात्र पोलिसांनी कुटुंबातील एका सदस्याला मारहाण करत आपल्याकडून ही नाणी चोरल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हंसराज सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. यामध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. अलिराजपूर येथे ही घटना घडली आहे. 

आदिवासी कुटुंबाला सोन्याची नाणी कशी सापडली? याबद्दल विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, तक्रारदारांना केलेल्या दाव्यानुसार गुजरातमध्ये खोदकाम करताना ही सोन्याची नाणी त्यांच्या हाती लागली. पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कलम 379 अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. 

पण एफआयआरमध्ये फक्त एका कॉन्स्टेबलचं नाव लिहिण्यात आलं आहे. तर तिघे अज्ञात असल्याचा उल्लेख आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी सध्या वाजवी पुष्टीवर हे आधारित असल्याची माहिती दिली. "याशिवाय सध्या सुरू असलेली चौकशी निःपक्षपाती आणि निष्पक्ष असावी. त्यावर कोणीही प्रभाव टाकू नये, अशी आमची इच्छा आहे," असं सिंह यांनी सांगितलं. 

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू सिंह याने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने सोंडवा पोलीस स्थानकातील 4 पोलीस कर्मचारी 19 जुलै रोजी माझ्या घरी आले होते असा दावा केला आहे. त्यांनी माझ्या पत्नीला मारहाण केली आणि घरात पुरुन ठेवलेली 240 नाणी नेली असा आरोप आहे. 

कुटुंबाने 20 जुलै दाखल केलेल्या एफआयआरमध्ये फक्त एका पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख केला होता. पण नंतर 21 जुलैला त्यांनी इतर तिघांवर आरोप केला. यामध्ये एक पोलीस निरीक्षक आहे असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे. 

तक्रारदाराने केलेल्या दाव्यानुसार, गुजरातमध्ये मी आणि माझं कुटुंब काम करत असताना आम्हाला ही सोन्याची नाणी सापडली. कुटुंबाने ही नाणी अलिराजपूर जिल्ह्यातील आपल्या घऱात जमिनीखाली पुरून ठेवली होती अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. 

अलीराजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी (SDOP) श्रद्धा सोनकर यांनी तक्रारीची चौकशी केली. या चौकशीनंतर चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आणि एफआयआर नोंदवण्यात आला.

रविवारी अलिराजपूरचे माजी आमदार आणि मध्य प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष नगर सिंग चौहान आणि इतरांनी दोन तास सोंडवा पोलीस स्टेशनला घेराव घातला. चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर चोरीऐवजी लुटीचा गुन्हा दाखल करत सर्व नाणी परत मिळवली जावीत अशी मागणी केली. जर पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली नाही, तर बंद पुकारु असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, पोलीस अधिक्षकांनी पुराव्याच्या आधारे अटकेची कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. 

तक्रारदाराने 7.98 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे पोलिसांकडे आणले होते. 1922 च्या काळातील ब्रिटिशकालीन नाणे 90 टक्के शुद्ध सोन्याचे होते. "त्यांनी शनिवारी चोरीला गेलेल्या नाण्यातील एक नाणं आमच्याकडे आणलं होतं," अशी माहिती अधिक्षकांनी दिली. 

दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांचं एक पथक तपासासाठी गुजरातला पाठवण्यात येणार आहे. जिथे खोदकाम करताना नाणी सापडल्याचा कुटुंबाचा दावा आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूर, झाबुआ आणि इतर जिल्ह्यांतील आदिवासी स्त्री-पुरुष अनेकदा गुजरात आणि राजस्थानमध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवास करत असतात.