लग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्...'

जयपूरमधील महेश नगर पोलीस ठाणे क्षेत्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाआधीपासून पत्नी गुटखा खात असून आपल्याला हे सांगण्यात आलं नव्हतं असा त्याचा आरोप आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2023, 01:35 PM IST
लग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्...' title=

जयपूरमध्ये एक अजब प्रकरण घडलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नी गुटखा खात असून लग्नाआधी आपल्याला त्याची माहिती देण्यात आली नव्हती असा पतीचा आरोप आहे. तसंच पत्नीच्या शरिरातील आतील भाग एका आजारामुळे निकामी झाले आहेत. ही गोष्टही आपल्यापासून लपवण्यात आली आणि खोटं बोलून लग्न लावण्यात आलं असा त्याचा आरोप आहे. ही गोष्ट उघड झाल्यानंतर पत्नी आणि तिचे कुटुंबीय हुंडाप्रकरणी अडकवू अशी धमकी देत असल्याचं त्याने सांगितलं आहे. महेशनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

महेशनगर पोलिसांनी सांगितलं आहे की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात महेश कुमारचं लक्ष्मी नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी महेश कुमारला आपली पत्नी गुटखा खात असल्याचं समजलं. तसंच तिच्या शरिरातील काही भाग निकामी झाले असल्याची माहितीदेखील मिळाली. लक्ष्मीचे वडील आणि कुटुंबीयांनी इतकी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवली होती. महेशने नाराजी व्यक्त करत पत्नीला लग्नाच्या काही दिवसांतच माहेरी पाठवलं. 

पण हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. महेशने पोलिसांना सांगितलं की, लक्ष्मीचे कुटुंबीय मूळचे भरतपूरचे राहणारे आहेत. ते नेहमी त्रास देतात आणि मारहाण करण्याची धमकी देतात. अखेर त्यांनी लक्ष्मीला सासरी पाठवून दिलं होतं. 

लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनीही मदत केली नाही. दुसरीकडे लक्ष्मीला घटस्फोट देण्याचा उल्लेख केला तर तिच्या कुटुंबीयांनी हुंडा आणि इतर प्रकरणात अडकवत पैसे लुटण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी लक्ष्मीने आपल्या कुटुंबीयांना बोलावलं आणि महेशच्या कुटुंबावर हल्लाही केला. यानंतर अखेर महेशने पोलीस स्टेशन गाठलं आणि पती लक्ष्मी, तिचे वडील, भाऊ आणि इतरांविरोधात मारहाण, फसवणूक यासह वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.