मालामाल...! शेतमजुराला लागली तब्बल १२ कोटींची लॉटरी

एका तिकीटाने पालटलं नशीब...

Updated: Feb 13, 2020, 08:41 AM IST
मालामाल...! शेतमजुराला लागली तब्बल १२ कोटींची लॉटरी  title=
संग्रहित छायाचित्र

तिरुवअनंतपूरम : आज तुम्हाला धनलाभ होणार आहे, असं लिहिलेलं राशीभविष्य वाचल्यानंतर आपल्या मनाला उगाचच दिलासा मिळतो. हा दिलासा असतो एका आशेचा, धनलाभ होणार असल्याचीच ही आशा. केरळच्या एका सर्वसामान्य मजुराने याचा प्रत्यक्षात अनुभवही घेतला आहे. 

दैनंदिन जीवनात शेतमजुरीचं काम करणाऱ्या केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एका व्यक्तीला एक- दोन नव्हे, तर तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'मालामाल' झाले आहेत. केरळ शासनाकडून देण्यात येणाऱ्या 'ख्रिसमस- न्यू इयर बंपर लॉटरी'चं प्रथम पारितोषिक या मजुराला मिळालं आहे. नुकतीच याविषयीची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर सर्वत्र या मजुराच्या मालामाल होण्याचीच चर्चा सुरु झाली. 

Rajan Perunnon राजन पेरुन्नन असं त्यांचं नाव असून, ते आपल्या कुटुंबासह कुरिच्या कॉलनी येथील मलूर पंचायत येथील रहिवासी आहेत. त्यांनी  ST 269609 क्रमांकाचं लॉटरीचं तिकीट कूथुपरंबू येथील एका विक्रेत्याकडून विकत घेतलं होतं. आपल्याला ही लॉटरी लागल्याचं कळताच दुसऱ्या दिवशी त्यांनी विजयी रक्कम मिळवण्यासाठीही प्रक्रिया सुरु केल्याचं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलं. 

राजन हे रोजंदारी तत्त्वावर शेतमजुरीची कामं करतात. तर, त्यांची पत्नी रजनी ही अंगणवाडीमध्ये कंत्राटी स्वरुपाची कामगार आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे. आपण दररोज लॉटरीचं तिकीट खरेदी करत असल्याचं राजन यांनी एक्स्प्रेसशी संवाद साधताना सांगितलं. एक ना एक दिवस तरी आपलं नशीब उघडेल आणि आपल्याला लॉटरी लागेल याच भाबड्या आशेवर त्यांचं हे सत्र सुरु होतं. अखेर तो दिवस उजाडला आणि खरंच राजन कोटयधीश झाले. यापूर्वी त्यांना १ हजार, ५ हजार अशा लॉटरींमध्येही यश मिळालं आहे. 

सध्याच्या घडीला मुलीच्या लग्नासाठी आणि नव्या घराच्या बांधणीसाठी म्हणऊन राजन यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. बँकेकडून घेण्यात आलेलं कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांचं घरही बँकेत गहाण पडलं आहे. त्यामुळे लॉटरीची रक्कम खात्यात जमा होताच सर्वप्रथम सर्व कर्ज रिते करण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय आपल्या धाकट्या मुलीला खूप शिकवण्याचीही त्यांची इच्छा आहे.

किती रक्कम राजन यांच्या वाट्याला जाणार? 

१२ कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या राजन यांच्या वाट्याला सर्व कर आणि एजन्सीचं कमिशन वगळता ७.२ कोटी रुपये इतकी रक्कम जाणार आहे. ज्या एजन्सीकडून हे लॉटरीचं तिकीट विकण्यात आलं आहे त्यांचा विजेत्या रकमेवर १० टक्के अधिकार असतो. ज्यामध्ये जीएसटीचाही समावेश असतो. राजन यांच्या खात्यात जमा होणारी ही रक्कम अविश्वसनीय असली तरीही त्यामुळे येत्या काळात त्यांचं पुरतं आयुष्यच बदलणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

केरळ सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून ३६ लाख तिकीटांची विक्री करण्यात आली होती. प्रत्येक तिकीटाची किंमत ही ३०० रुपये इतकी होती. यंदाच्या वर्षी लॉटरी तिकीटाच्या विक्रीतून सरकारला तब्बल २९ .९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.