रात्री शेवटचा सेल्फी काढला, मुलांना औषध पाजलं, नंतर गळफास घेतला; कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने शहर हादरलं

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने हादरलं आहे. दांपत्याने आधी आपल्या दोन्ही मुलांना कोल्ड्रिंकमधून सल्फास मिसळून पाजलं, नंतर गळफास घेतला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2023, 02:16 PM IST
रात्री शेवटचा सेल्फी काढला, मुलांना औषध पाजलं, नंतर गळफास घेतला; कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने शहर हादरलं title=

काही क्षणासाठी आलेला राग आणि निराशा अनेकदा आपल्याला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडतात. पण आपलं हे पाऊल आपल्यासह कुटुंबावरही अन्याय करणार असतं. पण याची जाणीव होईपर्यंत उशीर झालेला असतो. असंच एक प्रकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) पाहण्यास मिळालं आहे. जिथे एका कुटुंबाने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली असून, यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका दांपत्याने दोन मुलांना विष देऊन मारुन टाकलं, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट आणि सल्फासच्या गोळ्यांचं पाकिट सापडलं आहे. 

पोलीस उपायुक्त प्रकाश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र विश्वकर्मा (38) कोलंबियामधील आधारित एका कंपनीत ऑनलाइन काम करत होते. कंपनीने त्यांचा लॅपटॉप हॅक करत मोबाइलमधील सर्व फोन क्रमांकावर अश्लील व्हिडीओ व्हायरल केले होते. यामुळे भूपेंद्र चिंताग्रस्त होते. याच चिंतेत त्यांनी पत्नी रितूसह (35) आत्महत्या केली. पण आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलं  ऋतुराज (3) आणि ऋषिराज (8) यांना सल्फासच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. 

भूपेंद्र विश्वकर्मा यांचा मोठा भाऊ नरेंद्र विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रात्री उशिरा दोन्ही मुलांसह सेल्फी काढला होता. नंतर त्यांनी मुलांना कोल्ड्रिंकमधून सल्फास देत पाजलं आणि ठार केलं. यानंतर भूपेंद्र विश्वकर्मा आणि पत्नी रिटू यांनी दुपट्ट्याचा फास केला आणि दोघांनीही एकत्र लटकत आत्महत्या केली. 

सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रशेखर पांडे यांनी सांगितलं आहे की, "प्राथामिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत भूपेंद्र विश्वकर्मा कर्जात बुडालेले होते. भूपेंद्र विश्वकर्मा यांनी पहाटे 4 वाजता आपल्या सर्व नातेवाईकांनी व्हॉट्सअप मेसेज पाठवत आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. नातेवाईकांनी सकाळी उठल्यावर मेसेज वाचला आणि 6 वाजता पोलिसांना माहिती दिली".

पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा भूपेंद्र विश्वकर्मा आणि त्यांची पत्नी एका रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत होते. तर त्यांची मुलं दुसऱ्या एका खोलीत मृतावस्थेत पडलेली होती. त्यांना विष दिल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत होतं. दरम्यान, कर्जात बुडाले असल्यानेच भूपेंद्र विश्वकर्मा यांनी पत्नीसह आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.